अशोक गायकवाड
खोपोली : खोपोली नगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात तब्बल पावणेसतरा कोटींची वसुली केली असून, हा आजवरील सर्वाधिक वसुलीचा विक्रम आहे. मालमत्ता कर विभागाने गेले वर्षभर नियोजनबद्धरित्या वसुलीची रूपरेषा आखली होती. याचप्रमाणे खोपोलीकरांनी आपला मालमत्ता कराचा भरणा वेळेवर करून शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत हातभार लावावा, असे आवाहन खोपोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी केले आहे.
अनेक वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी न भरलेल्या २४ थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी नळ कनेक्शन तोडण्यात आले. थकबाकीदारांच्या नावांची बॅनरद्वारे जाहीर प्रसिद्धी यासारखी कारवाई करण्यात आल्याने वसुलीत विक्रमी वाढ झाली. पालिकेच्या तिजोरीत ३१ मार्चअखेर १६ कोटी ७५ लाख रुपये जमा झाले आहेत. मालमत्ता कर विभागाचे गौतम भगळे, गजानन जाधव यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली एकूण २० कर्मचारी वसुली मोहिमेकरिता नेमण्यात आले होते. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्यावसायिक मालमत्ता करधारकांडून पालिकेने वसुलीची थेट कारवाई सुरू केली. अनेक वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या २४ थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. मार्चनंतर देखील वसुलीची मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे.
