वर्धा: वर्धा लोकसभा मतदारसंघात सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणार आहे. भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या रामदास तडसांना त्यांची सुन पुजा तडस यांनीच थेट निवडणूकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरत आव्हान दिले आहे. पुजा तडस यांनी रामदास तडस यांच्यावर आणि संपूर्ण तडस कुटुंबियांवर छळवणूकीचे अनेक गंभीर आरोप केले आहेत.
वर्धा लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदास तडस हे तेली समाजाचे आहेत. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमर काळे हे कुणबी समाजाचे आहेत. या लोकसभा मतदारसंघाचा विचार करता या दोन्ही समाजाचे प्राबल्य या मतदारसंघात आहे.
विद्यमान खासदार रामदास तडस यांनी 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत दत्ता मेघे यांची पुत्र सागर मेघे यांचा पराभव केला होता. तसेच 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत देखील ते विजयी झाले होते. या निवडणुकीत त्यांनी 1 लाख 75 हजार मतांनी काँग्रेसच्या उमेदवार चारुलता टोकस यांचा पराभव केला होता. पण आता पूजा तडस रिंगणात उतरल्यामुळे तडसांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पुजा पंकज तडस (शेंदरे)यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे वर्धा मतदारसंघात खासदार सासऱ्याविरुद्ध सून निवडणूक रिंगणात असण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. म्हणूनच या राजकीय लढाईला मिळणाऱ्या वळणाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पूजा आणि पंकज यांच्या विवाहाचे किस्से एकेकाळी बरेच गाजले होते. दरम्यानच्या काळात पूजा यांच्यावर, आपल्या लहान मुलाला घेऊन एकटे, कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ आली. याच पार्श्वभूमीवर, मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी ही लढाई लोकशाही मार्गाने लढली जात असल्याचा दावा पुजा यांनी केला आहे.