माथेरान : 11 एप्रिलला शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे औचित्य साधत भारतीय बौद्ध महासभा, माथेरान – शाखा क्रमांक 10 व माथेरान गिरीस्थान नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि तेरणा मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर- नेरुळ (नवी मुंबई) व समर्पण ब्लड बँक, घाटकोपर यांच्या सहकार्यातून व तेरणा हॉस्पिटलचे समनव्यक रजनीश शुक्ला व सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांच्या विशेष प्रयत्नातून, भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर तसेच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. गरजूंना सर्व प्रकारच्या आधुनिक चाचण्या, तपासण्या आणि अगदी शस्त्रक्रिया व महत्वपूर्ण तज्ज्ञांचे सल्ले पण मोफत मिळाले तर खऱ्या अर्थाने त्यांस मदत होईल ह्या भावनेतून हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
१८६ नागरिक व ३५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या शिबिरास लाभला व एकूण २९ लोकांना पुढील उपचारास व चाचण्याकरिता येत्या दिवसात, तेरणा हॉस्पिटलमध्ये दाखल करत त्यांस योग्य ते उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येईल असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, औषध वाटप, नेत्रतपासणी व चष्मे वाटप इ. सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या माझ्या सर्व समाज बांधव, नगरपरिषद कर्मचारी वृंद, तेरणा हॉस्पिटल व समर्पण ब्लड बँक घाटकोपर येथील सर्व निष्णात डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, प्रीती हॉटेलचे स्टाफयांचे विशेष सहकार्य लाभले.
