स्वाती घोसाळकर
‘ ४०० पार कशाला हवेतर संसदेचा ताबा घ्या पण विरोधकांना सन्मान द्या, जनतेचा मोदींना पाठींबा असताना ईडीचा उपद्रव टाळला पाहिजे’
– गजानन कीर्तिकर
‘किर्तिकरांचे शरीर एकनाथ शिंदेसोबत तर आत्मा ठाकरेंसोबत आहे. भाजपाच्या जीवावर दोनदा खासदार झालेल्या कीर्तिकरांनी ठरवावे ते नेमके कुणासोबत आहेत’
– अमित साठम
मुंबई : एन निवडणूकीच्या काळात भाजपाप्रणित महायुतीत ईडीच्या अतिरकेवारून धुसफूस पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील खासदार गजानन कीर्तिकरांनी ईडीच्या अतिरेकी वापरामुळे आज जाहिरपणे भाजपाला खडेबोल सुनावले आहेत. ‘४०० पार कशाला हवेतर संसदेचा ताबा घ्या पण विरोधकांना सन्मान द्या, जनतेचा मोदींना पाठींबा असताना ईडीचा उपद्रव टाळला पाहिजे’, असा सल्ला गजानन कीर्तिकर यांनी दिला आहे. तर यावर भाजपाचे आमदार अमित साटम यांनी पलटवार करताना किर्तिकरांचे शरीर एकनाथ शिंदेसोबत तर आत्मा ठाकरेंसोबत आहे. भाजपाच्या जीवावर दोनदा खासदार झालेल्या कीर्तिकरांनी ठरवावे ते नेमके कुणासोबत आहेत’ अशी जहरी टिका केली आहे. त्यातच या जाहिर वादानंतर विद्यमान खासदार गजानन कीर्तिकरांचे तिकीट कापून त्यांच्या मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली जाण्याचे सुत्रांची माहीती असल्याने महायुतीत सारेकाही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.
गजानन कीर्तिकर सर्वात शेवटी शिंदे गटात दाखल होणारे खासदार ठरले होते. तर, रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणारे ठाकरे गटाचे शेवटचे आमदार आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली.या बैठकीत जोगेश्वरी विधानसभेचे आमदार रविंद्र वायकर यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना पक्षातून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेच्या उमेदवारांची यादी पुढील दोन दिवसात अधिकृत जाहीर केली जाणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. जोगेश्वरी विधान सभा मतदारसंघातून रविंद्र वायकर तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. त्याआधी ते सलग चारवेळा नगरसेवक म्हणून देखील निवडुण आलेत. रविंद्र वायकर मुंबई महापालिकेचे सलग चार वर्षे स्थायी समिती अध्यक्ष देखील होते.
गजानन कीर्तिकर यांना जागा वाटपासंदर्भात आक्रमक भूमिका घेत भाजपवर टीका केली होती. काल देखील गजानन कीर्तिकर यांनी संसदेचा ताबा घ्या पण विरोधकांना सन्मान द्या, असं म्हटलं होतं. खिचडी घोटाळ्यातील ईडी चौकशीसंदर्भात देखील गजानन कीर्तिकर यांनी भाष्य केलं होतं.
गजानन कीर्तिकर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. अमोल कीर्तिकर यांना ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. आता एकेकाळी उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेल्या रवींद्र वायकर यांच्याशी त्यांची लढत होईल.