९ मॅट्रिक टन प्लास्टिक जप्त
उल्हासनगर : उल्हासनगर शहरात बंदी असलेल्या प्लास्टिक चे उत्पादन सुरु असुन बिनधास्तपणे प्लास्टिक च्या पिशव्या दुकानदार ठेवत आहेत. ही माहीती अतिरिक्त जमीर लेंगरेकर यांना मिळताच त्यांनी आरोग्य निरीक्षकांना ताबडतोब कारवाई करण्यास सांगुन ९ मॅट्रिक टन प्लास्टिक चा माल जप्त केला आहे.
उल्हासनगरातील महादेव कंपाऊंड मध्ये असलेल्या एस. के. प्लास्टिक या कारखान्यात प्लास्टिक पिशवीचे रात्रीच्या वेळेत उत्पादन करीत असल्याबाबतची माहीती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांना मिळाली होती.तेव्हा त्यांनी काल आयुक्त अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार, विनोद केणे व प्लास्टिक निर्मूलन पथक प्रमुख जितेंद्र राठी व त्यांच्या पथकाने, प्रदूषण मंडळाचे भूपेंद्र कुलकर्णी, उप प्रादेशिक अधिकारी कल्याण ०१ , राजेश नांदगावकर , क्षेत्र अधिकारी कल्याण ०१ व अनिरुद्ध वराळे, उप प्रादेशिक कार्यालय कल्याण ०२ यांच्यासह संयुक्तरित्या रात्री सदर उत्पादन करण्याऱ्या कारखान्याची तपासणी केली असता ई पी आर नंबर शिवाय पॅकेजींग पिशव्या सर्रासपणे उत्पादन व विक्री करत होते. तर मोठे उत्पादन करून इतर शहरातही विक्री करत असल्याचे कारखानदार यांच्याकडून चौकशीत आढळून आले.
यावेळी जवळपास ९ मॅट्रिक टन माल जप्त्त करण्यात आला असुन त्यांच्यावर दहा हजार रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असल्याची माहीती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.
तसेच भावजीनगर येथील गोल्डन बेकरी यांचे मालक हे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्याचा वापर व विक्री करत असतानां दीड किलो पिशव्या हस्तगत करून पाच हजार रु. दंड वसूल करण्यात आला आहे. सदर मोहिमेत जवळपास ९ मॅट्रिक टन प्लास्टिक व १५ हजार रुपये वसूल करण्यात आले . दरम्यान प्रदूषण मंडळाकडून इपीआर नंबर न घेतलेल्या अशा सर्व कारखानदारावर यापुढे सतत कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रदूषण मंडळाचे अधिकारी यांनी सांगितले आहे.
प्रदूषण मंडळ व महापालिकेचा परवाना घेऊनच फूड पॅकेजिंग प्लास्टिक पिशव्याचा उत्पादन व विक्री करता येईल. तर कारखानदारास रिसायकल करणे आता शासनाने सक्तीचे व बंधनकारक केले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या अशा सर्व उत्पादकांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे प्रदूषण मंडळाचे अधिकारी यांनी महापालिकेस दोन दिवसापूर्वी मेल द्वारे कळविले होते.
ही मोहीम अचानक हाती घेऊन कारवाई करण्यात आली आहे . रात्री उशीरा पर्यंत कारवाई सुरु होती. व्यापाऱ्यांनी आपल्या फायद्यासाठी पर्यावरणाची हानी करणारे प्लास्टिक वापरू नये व अशा प्लॅस्टिकची विक्री करू नये. जर कोणी नियमभंग करत असल्यास नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागात तसे कळवल्यास कठोर कारवाई केली जाईल व संबंधितांचे व माहिती देणाऱ्याचे नाव देखील गोपनीय ठेवण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी जाहीर आवाहन केले आहे.
