मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येत अनुयायी येतात. या आंबेडकरी अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेने रविवारी घेण्यात आलेला मेगाब्लॉक रद्द केला आहे. पश्चिम रेल्वेने रविवारी घेण्यात आलेल्या नियोजित मेगाब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे आंबडेकरी अनुयायांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप-डाऊन धीम्या मार्गावर; तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक कायम राहणार आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल देसाई यांनी हा मेगाब्लॉक रद्द करण्याची आग्रही मागणी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्राद्वारे केली होती. या पत्राची दखल घेत पश्चिम रेल्वेने रविवारचा नियोजित मेगाब्लॉक रद्द केला आहे.