राहुल गांधींचा पलटवार

भंडारा: बेरोजगारी, महागाई, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर बोलायचे सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमद्राखाली पुजा करतात, विरोधकांच्या मासांहर खाण्यावर टिका करतात… आपल्या या कृतीने सामान्य जनतेचे मुलभूत प्रश्नावरून ते लक्ष हटवू पहात असले तरी त्यांच्या या कृतीमुळे ते लोकशाहीची थट्टा करीत आहेत अशी खरमरीत टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. शनिवारी साकोलीत काँग्रेस पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत राहूल गांधी बोलत होते.

मोदींनी प्रसार माध्यमांवरही धाक बसविला आहे. या धाकामुळेच केवळ  बॉलीवूड स्टार्स, क्रिकेटर्स आणि पंतप्रधान मोदी यांनाच प्रसार माध्यमे २४ तास दाखवत आहेत. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर कोणीही बोलत नाही, अशी खंतही राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडून सातत्याने सुरु असलेल्या धार्मिक राजकारणाच्या मुद्द्यावर भाष्य केले.  मोदी कधी समुद्राखाली पूजा करताना दिसतात, त्यावेळी त्यांच्यासोबत पुजारी नसतो. मोदी लष्करी अधिकाऱ्यांसोबत पूजेला बसलेले दिसतात. ते विकासाच्या, महागाईच्या आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर कधीच बोलत नाहीत. त्यांच्याकडून 24 तास धर्माचे राजकारण सुरु असते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. आम्ही हरितक्रांती, दूधक्रांती, बँकाचे राष्ट्रीयीकरण करतो, पण मोदी 24 तास धर्मावर बोलतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

कोरोनाच्या काळात देशात मृतदेहांचा खच पडला होता. गंगेत लाखो मृतदेह वाहत होते. पण पंतप्रधान मोदी लोकांना सांगत होते की, थाळ्या वाजवा. नंतर ते म्हणाले मोबाईल फोनच्या टॉर्च लावा. जग या सगळ्याकडे बघत होते. कारण इतर कोणत्याही देशातील पंतप्रधान थाळ्या वाजवत नव्हता, ते लोकांचा जीव वाचवत होते, असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडले. नरेंद्र मोदी घटकेत एक गोष्ट बोलतात, घटकेत दुसरी गोष्ट बोलतात. ते लोकांची दिशाभूल करुन उद्योगपतींच्या खिशात पैसे टाकतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

सभा हाऊसफुल

राहुल गांधी यांच्या भंडाऱ्यातील सभेस पन्नास हजार लोक उपस्थित राहतील, असा अंदाज होता. मात्र, सभेच्या ठिकाणी प्रत्यक्षात लाखाच्या आसपास लोक आले. पन्नास हजार लोकांचीच व्यवस्था केल्याने हजारो लोकांना ताटकळत भाषणे एकावी लागली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *