सिंधुदुर्ग: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर अखेर भाजपाने एकतर्फी मोहोर उमटवली आहे. भाजप नेते नारायण राणे हे येत्या १९ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या जागेसाठी एकनाथ शिंदे गटाचे किरण सामंत इच्छूक आहेत. किरण सामंत यांचे बंधू उदय सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर आपला दावा असल्याचे वारंवार सांगितले आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरण सामंत यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले होते. नारायण राणे कोणत्याही क्षणी उमेदवारी अर्ज भरु शकतात, याची कुणकूण लागल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात होते.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेसहीत महायुतीमध्ये लोकसभेच्या एकूण ९ जागांवर अद्याप एकमत होऊ शकलेले नाही. सावंतवाडीत महायुतीत बेबनाव असल्याचे दिसून आले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे संभाव्य उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शनिवारी वेंगुर्ल्यात जिल्हा परिषदनिहाय बैठका घेणार होते. मात्र, या सर्व बैठका अचानक रद्द करण्यात आल्या.  विशेष म्हणजे भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी स्टेटस ठेवत, ‘कुणाच्या तरी हट्टामुळे दोन वेळा नियोजित सभा रद्द झाल्या’, असा अप्रत्यक्ष टोला दीपक केसरकर यांना लगावला. त्यामुळे याठिकाणी भाजप आणि शिंदे गटात बिनसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून या अडचणीतून कशाप्रकारे मार्ग काढणार, हे पाहावे लागेल. बारामती लोकसभा मतदारसंघात फडणवीसांनी विजय शिवतारेंची समजूत काढली त्याप्रमाणे रत्नागिरी-सिंधुदुर्गात उमेदवार न मिळालेल्या नेत्याची समजूत काढली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *