सांगली: सागंलीच्या जागेवर उद्धव ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केल्यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील नाराज आहेत. विशाल पाटील यांनी आता सांगलीतून अपक्ष लढण्याची तयारी सुरु केली आहे. ते जर निवडणूक लढविणार असतीलच तर वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठींबा देईल असे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी नागपूरच्या उमरेड येथे सभा झाली. यावेळी त्यांनी सांगली लोकसभेच्या जागेबाबत भाष्य केले. या सभेत त्यांनी म्हटले की, चार दिवसांपूर्वी प्रतीक पाटील माझ्याकडे आले होते, काय करायचं विचारत होते. मी त्यांना म्हणालो की, हिंमत असेल, तर लढा. तुम्ही लढलात तर आम्ही तुम्हाला पाठींबा देतो. आता त्यांच्यात हिंमत आहे की, नाही पाहायचे आहे. ते लढले, तर पाठिंबाही देऊ आणि निवडून आणू, अशी ग्वाही देतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.