मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथिल घराबाहेर काल पहाटे दोन अज्ञातांनी गोळीबार केला. त्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथिल घराबाहेर पहाटे गोळीबाराचा आवाज आला, असे पोलिसांनी सांगितले. पहाटे 5 वाजता मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हवेत अनेक राऊंड गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता क्राइम ब्रँचची टीमही घटनास्थळी हजर असून गोळ्यांच्या खुणा तपासत आहेत. अभिनेता सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. गेल्या वर्षी पंजाबी गायक सिद्धू मूस वालाच्या हत्येनंतर सलमानला गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई या गुंडांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.
सलमानला धमकीचा ई-मेल आला होता, त्यानंतर मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता.
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर शिवसेना (यूबीटी) नेते आनंद दुबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘गुन्हेगार बेधडक फिरत आहेत’, असे म्हणत दुबे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा समाचार घेतला.
ते पुढे म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्रात कोणालाही सुरक्षित वाटत नाही. अलिकडेच मुंबईत आणि डोंबिवलीत एका आमदारावर गोळीबार झाल्याचे तुम्ही पाहिले आहे. ही कसली कायदा आणि सुव्यवस्था आहे? गृहमंत्री, मुख्यमंत्री, तुम्ही कुठे आहात? गृहमंत्र्यांनी या घटनेची दखल घ्यावी, असे दुबे म्हणाले.
