नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीकरिता लागू झालेल्या आचारसंहितेमुळे नवी मुंबई हद्दीतील जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांना मागील वर्षाची शिष्यवृत्ती आता थेट पावसाळ्यात मिळणार आहे. प्रशासकीय दिरंगाईचा फटका नवी मुंबईतील गरजू आणि शाळकरी विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. तसेच चालू २०२४-२५ वर्षातील शिष्यवृत्तीची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. धिम्या गतीने पडताळणी आणि कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे विद्यार्थी आणि पालकवर्गाला शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे.
नवी मुंबई महापालिकेतर्फे स्वःखर्चातून शहरातील विविध गरीब आणि गरजू घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती दिली जाते. महापालिकेच्या हद्दीतील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीच्या रकमेचा लाभ मिळतो. त्याकरिता महापालिकेतर्फे दरवर्षी सप्टेंबर अथवा ऑक्टोबर महिन्यांत शिष्यवृत्ती योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज आणि पुरावे मागवले जातात. मात्र, २०२३ या वर्षातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच ऑनलाईन अर्जाद्वारे शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु हा निर्णय उशिराने झाल्यामुळे हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने उशिरा उपलब्ध झाले. त्यामुळे अर्ज उशिरा आल्यामुळे अर्ज भरण्यासही पालक व विद्यार्थ्यांकडून उशीर झाला. उशिरा आलेल्या अर्जांची छानणी व पडताळणी करण्यात वेळ गेल्यामुळे गेल्यावर्षीच्या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना यावर्षी देण्यात येणार होता. महापालिकेकडे शिष्यवृत्तीकरिता ४० हजार अर्ज आले आहेत. या अर्जांची अद्याप समाजविकास विभागस्तरावर पडताळणी करण्याचे काम सुरू होते. त्यादरम्यान लोकसभा निवडणुकांकरिता आचारसंहिता घोषित झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कर्तव्याकरिता नियुक्त करण्यात आले. समाजविकास विभागाचे बरेचसे कर्मचारी निवडणुकीच्या कामाला गेल्यामुळे शिष्यवृत्तीच्या अर्जांची पडताळणी धिम्या गतीने सुरू आहे. तसेच आचारसंहितेमध्ये योजनेचा लाभ देता येत नाही, असे प्रशासनाने गृहित धरून ठेवल्यामुळे आता शिष्यवृत्तीचा लाभ थेट पावसाळ्यात होईल, अशी दाट शक्यता आहे.
या घटकांना मिळते शिष्यवृत्ती
– विधवा अथवा घटस्फोटीत महिलांच्या मुलांना
– आर्थिक व दुर्बल घटकांतील पालकांच्या मुलांना
– मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना
– महापालिका हद्दीतील प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांना
– महापालिकेतील आस्थापनेवरील व कंत्राटी सफाई कामगारांच्या मुलांना
– शहरातील दगड खाण, बांधकाम, रेती आणि नाका कामगारांच्या मुलांना
या योजनाही रखडल्या
नवी मुंबई महापालिकेच्या समाजविकास विभागातर्फे शहरातील नागरिकांना वेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो. त्यापैकी कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या विधवा महिलेला २५ हजार रुपये, विधवा महिलेच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसाह्य ६५ हजार, मागासवर्गीय मुलींच्या विवाहासाठी अर्थसाह्य ५० हजार आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना अर्थसाह्य ५० हजार रुपयांची मदत केली जाते. मात्र, आचारसंहितेच्या आधी आलेल्या अर्जांवर संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही न केल्यामुळे योजनेला पात्र असणाऱ्या नागरिकांचे शेकडो अर्ज विभागनिहाय रखडून पडले आहेत.