सोलापुर : शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाने आज पुन्हा एकदा भाजपाप्रणीत महायुतीला धोबीपछाड दिली. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणाऱ्या शरद पवार, सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहीते पाटील हे तीन ब्रिलियंटस नेते माढा मतदार संघासाठी मोर्चेबांधणी करण्याकरीता एकत्र आले. आणि अवघं राजकारण ढवळून निघाले.

माढ्यात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते-पाटील घराणे प्रचंड नाराज झाले आहे. मात्र, या नाराजीची भाजपकडून दखल न घेण्यात आल्याने धैर्यशील मोहिते-पाटील  यांनी आता कमळाची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा भाजप आणि महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या सोलापूरच्या दौऱ्यात अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. या भेटीत माढा लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केली. “सोलापूरमधील सर्व स्थानिक नेते आज येथे उपस्थित आहेत. या निवडणुकीमध्ये जे उमेदवार पक्षाने दिले आहेत, त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहेत. माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा होती. याबाबत आज त्यांना विनंती केली. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील. सोलापूर जिल्हा नेहमीच पुरोगामी राहिलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आहे”, असे शरद पवार म्हणाले.

यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना भाजपाच्या ४०० पारच्या नाऱ्यावरुन खोचक टोला लगावला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे व्लादिमीर पुतिन यांच्यात फरक नाही”, असे शरद पवार म्हणाले.

“आश्वासने देणे हे भाजपाचे वैशिष्ट्य आहे. ईडी, सीबीआयचा गैरवापर करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूत्र आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे व्लादिमीर पुतिन यांच्यात काही फरक नाही, या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत”, असे शरद पवार म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. पंतप्रधान मोदी यांची अनेक भाषणे पंतप्रधानपदाला शोभण्यासारखी नाहीत. त्यांनी गेल्या निवडणुकीवेळी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील अनेक आश्वासने आजही पूर्ण केलेली नाहीत. पंडित जवाहरलाल नेहरू यांना जाऊन किती वर्ष झाले, त्यांचे योगदान ऐतिहासिक आहे. पण पंतप्रधान मोदी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतात”, असे शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *