नवी दिल्ली : पुन्हा सत्तेत आल्यास देशभर समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणूक लागू करण्यासोबतच ७० वर्षांच्या सर्व वयोवृद्धांना तसेच तृतीयपंथीयांना आयुष्यमान योजना लागू करण्याच्या १० महत्त्वपूर्ण घोषणांची मोदींच्या गॅरंटीचा जाहीरनामा आज भारतीय जनता पार्टीने सादर केला. या जाहीरनाम्यात घोटाळेबाजांना दयामाया न दाखवता तुरुंगात टाकणारी भ्रष्टाचाराविरोधी मोहीम यापुढेही चालू राहील, अशी हमी देत विरोधकांना चपराक देण्यात आली आहे.
भाजप मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते.
या जाहीरनाम्यात रोजगाराच्या संधी, महिला सक्षमकरण आणि शेतकरी यांच्यावर विशेष भर देण्यात आला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात उद्योजकतेवरही लक्ष देण्यात आलं आहे. जनतेला पुढील पाच वर्षांपर्यंत मोफत रेशन मिळेल. पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतील. जन औषधी योजनेचा विस्तार केला जाईल, असंही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं आहे.
विकास, हिंदुत्वाची विरासत आणि गरिबांचे कल्याण या त्रिसूत्रीला गुंफणारे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे ‘संकल्पपत्र’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी, आंबेडकर जयंतीदिनी जनतेला सादर केले.
भारताने चंद्रयान मोहीम यशस्वी केली, आता गगनयान मोहिमेअंतर्गत २०२५ मध्ये अंतराळवीरांना अंतराळात पाठवले जाईल. ‘जी-२०’चे यशस्वी आयोजन केल्यानंतर २०३६ मध्ये ‘ऑलम्पिक’ स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी तयारी सुरू केली जाईल. देशातील १४० कोटी जनतेच्या अशा असंख्य महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे हेच मोदीचे ‘मिशन’ आहे, अशी ग्वाही जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर झालेल्या भाषणात मोदींनी दिली.
भाजपने जाहीरनाम्याला ‘मोदी की गॅरंटी-२०२४’ असे संबोधले असून मोदींनी केंद्रात तिसऱ्यांदा पूर्ण बहुमतातील सरकार निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले. भाजपच्या ६९ पानी संकल्पपत्रामध्ये विद्यमान कल्याणकारी योजनांच्या विस्तारीकरणाची हमी देण्यात आली आहे.
२०४७ पर्यंत देशाला विकसीत आणि समृद्ध करायचे असेल तर केंद्रात सक्षम सरकारची आवश्यकता आहे. ४ जूनला भाजपचे सरकार केंद्रात आल्यावर तातडीने संकल्पपत्राच्या ध्येय पूर्तीसाठी काम सुरू केले जाईल. नव्या सरकारच्या पहिल्या १०० दिवसांतील कार्याचा कृती आराखडा आधीच तयार केला असल्याचे सांगत मोदींनी ‘तिसरी बार मोदी सरकार’ची अप्रत्यक्ष घोषणा केली.
भाजपाचा जाहीरनामा हा ‘फेकूनामा’- नाना पटोले
सत्तेत असताना 10 वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भाजपाने नोकरीच्या नावाने देशातील तरुणांना फसवले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणून शेतकऱ्यांना फसवले, जीएसटीच्या माध्यमातून छोटे व्यापारी व जनतेला फसवून अदानीचे खिसे भरले आणि पुन्हा याच घटकांना फसवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’ असून जनता आता भाजपाच्या या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.