बदलापूर : प्रधानमंत्री आवास योजना, हर घर जल, हर घर नल अशा अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकार गावागावात पोहचवत आहेत; मात्र कासगाव-गोरेगाव या दोन्ही गावात सरकारच्या ‘हर घर जल, हर घर नल’ या योजनेच्या कामावर ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांनीच माती टाकली आहे. त्यामुळे आता पाण्यासाठी वांगणीतील आदिवासी बांधव आणि ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून आक्रोश करण्याची वेळ आली आहे.

जलजीवन मिशनच्या ‘हर घर जल, हर घर नल’ या योजनेअंतर्गत कासगाव व गोरेगाव येथील साधारण दोन हजार ग्रामस्थांच्या पाणी समस्येवर उपाय म्हणून २०२२ मध्ये या कासगाव येथे नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पाण्याच्या टाकीपासून गावापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी एक कोटी ९८ लाख ५८ हजार म्हणजे जवळपास दोन कोटींच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. अंबरनाथ ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या माध्यमातून कामाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. त्यानंतर संबंधित कामाचा ठेका हा मे. लीना पांडुरंग पाटील या ठेकेदाराला देण्यात आला. तसेच साहाय्य संस्था म्हणून एम.जे.एस. प्रायव्हेट लिमिटेड इंडिया या कंपनीने सहकार्य केले आहे. हे काम २९ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र अद्यापही पूर्ण झालेले नाही.

उल्हास नदीच्या किनाऱ्यावरच जुन्या पाण्याच्या टाकीच्या शेजारी नवी पाण्याची टाकी उभारण्यात आली. या टाकीतून गावागावात नळ योजना देण्यासाठी मोठमोठे पाईप टाकीला जोडून जमिनीच्या आतून गावागावात पोहोचवण्यात आले; मात्र बांधलेली नवीन टाकी आजही अपूर्णावस्थेत असून त्या टाकीचे अजिबात खोलीकरण केलेले नाही. त्यात टाकीवर छप्परच बसवलेले नाही. त्यामुळे मोकळ्या पाण्यात जीवजंतू पडण्याचा धोका आहे; मात्र तरीदेखील पाणी नळातून सोडण्यास सुरुवात झाली; पण असे होऊनही ग्रामस्थांच्या नळाला पाणी काही येत नाही. या सगळ्या कामात संबंधित ठेकेदार आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी अक्षरशः ग्रामस्थांच्या मूलभूत प्रश्नांची हेळसांड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. कामाची पाहणी करण्यासाठी अंबरनाथ पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी शेख आले होते; मात्र त्यांनी यावेळी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

अर्ध्या फुटावरच जलवाहिनी

काही महिन्यांपूर्वी गावकऱ्यांनीच टाकीतून पाणीपुरवठा करणारे पाईप जमिनीतून कशाप्रकारे सोडले आहेत हे पाहण्यासाठी जमीन खोदली. यावेळी गावकऱ्यांच्या असे निदर्शनास आले की हे पाईप जवळपास अर्धा ते एक फूट इतक्याच खोलीवर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे टाकीतले पाणी पाईपमधून पुढे जात नाही. साधारण ही जलवाहिनी जमिनीपासून चार ते पाच फूट खोल टाकण्यात येणे आवश्यक होते; मात्र अर्धा ते एक फूट खोल असणाऱ्या या वाहिनीतून पाणी येणार कसे, असा प्रश्न ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारला आहे.

ठेकेदार व ग्रामस्थांमध्ये वाद

संबंधित ठेकेदार व प्रशासनाने कानाडोळा केल्याने ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी ठेकेदार व संबंधित कर्मचाऱ्यांसमोर पाण्यासाठी आक्रोश करत जाब विचारला. यावेळी ठेकेदार व ग्रामस्थांची बाचाबाचीदेखील झाली. हर घर जल योजनेचे काम अपूर्णावस्थेत असल्याने आम्ही पाण्यासाठी असेच तडफडत आयुष्य जगायचं का, असा प्रश्न या ग्रामस्थांनी विचारला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार, राजकीय नेते मतदारसंघातील सामान्य व दुर्लक्षित अशा घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न का करत नाहीत, आमच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी सरकार व प्रशासन उदासीन का आहे, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.

मी कासगाव या गावातील ग्रामस्थ असून मागील अनेक वर्षांपासून शासनाच्या हर घर जल, हर घर नल या योजनेचा पाठपुरावा करत आहे. या योजनेअंतर्गत कासगाव या ठिकाणी मोठा घोटाळा झाला आहे. मंजूर झालेल्या दोन कोटींच्या कामांची पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी, तसेच ही योजना अपूर्णावस्थेत असून जे काम झाले आहे ते दर्जाहीन आहे. अनेकदा माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करूनही या कामाच्या संदर्भात, शासकीय कर्मचारी कोणतेही उत्तर देत नाहीत. त्यामुळे आम्ही जाब विचारायचा कोणाला, हा प्रश्न आम्हाला पडला आहे.

-राकेश टेंबे, ग्रामस्थ, वांगणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *