६०० सुरक्षा जवानांनी केलं मतदान

गडचिरोली : लोकशाहीतील सर्वात मोठ्या पर्वाला सुरुवात होण्यास आता केवळ चार दिवस उरले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल भागात कर्तव्यपथावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या जवानांसाठी पहिल्यांदाच विशेष सोय करण्यात आली आहे. कुठलाही पोलीस जवान मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने यंदा जिल्ह्यात पहिल्यांदाच पोलिसांसाठी टपाली मतदान सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या उपक्रमामुळे दंडकारण्यात आपले कर्तव्य बजावत असलेल्या सुमारे 600 जवानांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

दुर्गम भागात पहिल्यांदाच मतदान केंद्र

आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त अशा गडचिरोली जिल्ह्यात कुठलीही निवडणुक ही पोलिसांशिवाय शक्यच नाही. अश्यावेळी पोलिसांच्या विविध तुकड्या दुर्गम भागात तैनात केल्या जातात. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय त्यांना परत आपल्या घरी जाता येत नाही. अशातच मतदानाच्या दिवशी मतदान करण्याची इच्छा असून देखील त्यांना मतदान करता येत नाही, अशा वेळी त्यांना टपाली मतदानाची संधी असली तरी अनेकजण मतदानापासून वंचित असतात. तर काही मतदार मतदान करतच नाही. त्यामुळे टपाली मतदानाची टक्केवारी त्यामानाने कमीच होते. त्यामुळे कुठलाही पोलीस जवान मतदानापासून वंचित राहू नये म्हणून यंदा पहिल्यांदाच जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांच्या संकल्पनेतून पोलिसांसाठी टपाली मतदान सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता दुर्गम भागातील पोलिस अधिकारी आणि जवानांना आपले मौल्यवान मत देता येणार आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या आधी पोलीस विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या अगोदरच मतदान करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. काल 14 एप्रिल रोजी सहाय्यक निवडणूक अधिकारी कार्यालय अहेरी येथे सी-60 च्या जवानांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यात सुमारे 600 जवानांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती  गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *