वाडा : ठाणे, पालघर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात गेल्या 15 वर्षात जिजाऊ या संघटनेने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा व या कामाला अधिक वेग येण्यासाठी तुमच्या हक्काचा खासदार जिजाऊचा एक मावळा दिल्लीला पाठवा असे आवाहन भिवंडी लोकसभा मतदारसंघात जिजाऊ संघटनेकडून निवडणूक रिंगणात असलेल्या निलेश सांबरे यांनी वाडा येथे केले.
आज सोमवारी (15 एप्रिल) वाडा येथे जिजाऊ संघटना कार्यकर्ता संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. वाडा तालुक्यातील पाच हजारांहून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या संवाद सभेत महिलांची संख्या लक्षणीय होती. या सभेत तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
कुठल्याही प्रकारचे लोकप्रतिनिधीत्व नसताना निलेश सांबरे यांनी पालघर व ठाणे जिल्ह्यात जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून उभारलेले कार्य येथील सर्व पक्षांतील लोकप्रतिनिधींना लाजवेल असेच आहे. असे या संवाद सभेत बोलताना अनेक मान्यवरांनी सांगितले.
गेली 10 वर्षे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व करणा-या भाजपाच्या उमेदवाराला या मतदार संघात दाखविण्यासारखे एकही काम करता आलेले नाही. म्हणून ते आता मोदींच्या नावाने मते मागताना दिसत आहेत. प्रत्येक सभांमध्ये ते मोदींनी हे केले, मोदींनी ते केले असेच सांगत फिरत आहेत.
मात्र केंद्रीय मंत्रीपद असतानाही मी काही केले आहे. हे ते सांगु शकत नाहीत असे या संवाद सभेत बोलताना कुडूस ग्रामपंचायतीचे उपसरपंच डॉ. गिरीश चौधरी यांनी सांगुन गेल्या दहा वर्षांत कुडूसमध्ये कधी न येणारे विद्यमान खासदार कपिल पाटील निवडणूक जाहीर होताच गेल्या महिनाभरात पाच वेळा का आले? हे मतदारांनी समजून घ्यावे असेही चौधरी यांनी यावेळी सांगितले.
जिजाऊ संघटनेने गेल्या 15 वर्षात केलेल्या विविध विकासकामांबाबत बोलताना निलेश सांबरे यांनी सांगितले की या मतदारसंघातीलच नव्हे तर या परिसरातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचल्या पाहिजेत, या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे.
येथील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे, आरोग्याच्या चांगल्या दर्जाचे सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, आणि याचसाठी आपण ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे असे निलेश सांबरे यांनी यावेळी सांगितले.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने शेतकरी आहेत.या ठिकाणी शेती उत्पादनावर आधारित कारखाने येण्याची गरज असताना ते आजवर आले नाहीच उलट येथील शेती उध्वस्त करणाऱ्या स्टील रोलिंग मील आल्या, येथील उन्हाळी, पावसाळी पिके उध्वस्त करणारे रासायनिक कारखाने आले असे सांबरे यांनी सांगून स्थानिक तरुणांना रोजगार देणारे या मतदार संघात कारखाने आणण्याऐवजी या ठिकाणी थोडेफार रोजगार देणा-या अनेक कारखान्यांसमोर विज, पाणी, दळणवळण अशा समस्या निर्माण करुन हे कारखाने गुजरातकडे स्थलांतर करण्यास भाग पाडले व येथील हजारो रोजगारांना बेरोजगार केले असा आरोपही सांबरे यांनी यावेळी केला.
जिजाऊ संघटनेचे विविध पदाधिकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पाच हजारांहून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती या संवाद सभेला लाभली होती.
