ठाणे : उन्हाळा सुरू झाल्यावर रसाळ कलिंगडांना मागणी वाढते; परंतु बाजारात लालऐवजी पिवळी कलिंगडे दाखल झाली आहेत. ही पिवळी कलिंगडे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ही कलिंगडे चवीला गोड व आरोग्यासाठी चांगली असल्याचे विक्रेते सांगतात. तसेच ग्राहकांचा पिवळ्या कलिंगडाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
सध्या उन्हाळा तीव्रतेने वाढत आहे. तापमान वाढीमुळे शरीराला थंडावा मिळावा, यासाठी शीतपेये तसेच फळांना मागणी वाढत आहे.
यात थंडगार कलिंगडाला सर्वाधिक मागणी असते. सध्या बाजारात कलिंगडाला मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात आवकही वाढली आहे. कलिंगड विकत घेताना ग्राहक आतून कलिंगड लाल आहे ना, याची खात्री करून मगच खरेदी करतात; मात्र आता बाजारात आतून पिवळी असणारी कलिंगडेही दाखल झाली आहेत.
सोलापूरहून ही कलिंगडे ठाण्यातील मार्केटमध्ये उपलब्ध झाली आहेत; मात्र या पिवळ्या कलिंगडाला ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. याची चव गोडच असल्याची माहिती विक्रेते हरी जयस्वाल यांनी दिली; मात्र हे आरोग्यासाठी कसे आहेत, याबाबत ग्राहकांमध्ये शंका असल्याने याच्या खरेदीला संमिश्र असा प्रतिसाद मिळत आहे.
सध्या कलिंगडाची ३० रुपये किलोने विक्री होत असून १०० रुपयांना प्रतिनग मिळत आहे; तर आतून पिवळ्या दिसणाऱ्या अशा कलिंगडची किंमत ५० ते ६० रुपये किलो आहे; तर एका कलिंगडाची किंमत १५० ते २०० रुपये असल्याची माहिती पाचपाखाडी येथील फळविक्रेते हरी जयस्वाल यांनी दिली आहे.
