भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फोडले असा आरोप उद्धव ठाकरे आणि शरद पवार नेहमीच करत असतात. काल भंडारा येथे झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी या आरोपाला उत्तर दिले हे दोन्ही पक्ष आम्ही फोडले नाही, तर शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंच्या पुत्र प्रेमामुळे फुटला आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवारांच्या कन्या प्रेमामुळे फुटला असा आरोप अमित शहा यांनी केला.
अमित शहा यांच्या या आरोपाला शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते आणि पवार कुटुंबातील दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी रोहित पवार आणि शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. या दोघांनीही एक मुद्दा मांडला की अमित शहा म्हणतात की आम्ही पक्ष फोडला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून, याचा अर्थ काय घ्यायचा? भाजपमध्येच दोन नेत्यांमध्ये एक वाक्यता नाही का असा सवाल या दोन्ही नेत्यांनी केला आहे.
इथे एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटले आणि ते फोडण्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या भाजपचा हात होता हा मुद्दा नाकारता येणार नाही. मात्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी पक्ष फोडला तरी त्यांना पक्ष फोडण्याची संधी तुम्ही का दिली? फोडणारे कितीही पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतील, मात्र तुमची तटबंदी अभेद्य असेल तर तुमचा पक्ष फुटणार नाही. छत्रपती शिवरायांच्या साम्राज्याला मोगलांकडून धडका मारण्याचे असंख्य प्रयत्न झाले. मात्र प्रत्येक वेळी शिवरायांची तटबंदी अभेद्य असायची. त्यांचे सर्व मावळे जीवाला जीव देणारे असायचे. त्या सर्व मावळ्यांना एक विश्वास होता की हा राजा आमच्यावर कधीच अन्याय करणार नाही. त्यामुळे हजारोंच्या मोगल सैन्यालाही मूठभर मावळे पराभूत करायचे.
ज्यावेळी जून २०२२ मध्ये शिवसेना फुटली किंवा जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, त्यावेळी अशी अभेद्य परिस्थिती होती काय? शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचा त्यांच्या नेत्यावर विश्वास राहिला होता काय? याची उत्तरे शिल्लक शिवसेना आणि शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी कठोर आत्मपरीक्षण करून शोधायला हवीत. भाजपने आमचा पक्ष फोडला असा आरोप करताना तुम्ही त्यांना फोडू का दिला? असा प्रश्न कोणीही विचारू शकतो. त्याला तुम्ही उत्तर काय देणार हे आधी ठरवा मगच आरोप करायला हवे.
मुळात २० जून २०२२ रोजी शिवसेनेच्या फुटीला सुरुवात झाली. त्या मागची कारणे पुन्हा एकदा शोधायला हवीत. शिवसेना या पक्षात गत काही वर्षांपासून प्रचंड नाराजी होती. शिवसैनिक एकमेकांवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्यात आधी २०१४ मध्ये भाजपासोबत २५ वर्षांपासून असलेली युती तुटली. ही युती जरी भाजपाने तोडली तरी भाजपला ही युती तोडण्याची वेळ शिवसेना नेत्यांच्या दुराग्रहामुळेच आली होती. नंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या आणि भाजपने आपली ताकद दाखवून दिली. त्यावेळी शिवसेनेला सत्तेबाहेर राहायची वेळ आली होती. कदाचित त्याचवेळी म्हणजे डिसेंबर २०१४ मध्ये शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आली होती. शिवसेनेतील त्यांच्या तत्कालीन ६३ आमदारांपैकी ४० पेक्षा अधिक आमदार वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत सरकारमध्ये जाण्याच्या तयारीत होते. ही कुणकुण उद्धव ठाकरे यांना लागली, म्हणून त्यांनी घाई घाईने फडणवीसन सोबत तह केला. आणि जे काही मिळेल ते पदरात पाडून पुढली पाच वर्ष कसेबसे सरकार चालवले.
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुका शिवसेना भाजप युतीने लढवल्या. विधानसभा निवडणुकाही युतीनेच लढवल्या. नंतर मात्र निकाल लागताच उद्धव ठाकरेंनी रंग दाखवायला सुरुवात केली. त्यावेळी देखील त्यांनी भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा शिवसेनेतील मोठ्या गटाला मान्य नव्हता. त्यातही जर भाजपसोबत युती राहिली असती तर उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात येण्याची शक्यता नव्हती. अशावेळी एकनाथ शिंदे हेच शिवसेना गटनेते राहिले असते. मात्र सत्तेच्या मोहात पडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी भाजप सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी केली. इथे मुख्यमंत्री जरी उद्धव ठाकरे होते, तरी सरकारचा रिमोट कंट्रोल हा शरद पवारांच्या हाती होता. परिणामी राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेनेच्या मंत्री आणि कार्यकर्त्यांना कायम दाबत असल्याची तक्रार पुढे येत होती. त्याचवेळी उद्धव ठाकरे हे आपले सुपुत्र चिरंजीव आदित्य याला मुख्यमंत्रीपदाचा आणि पक्षप्रमुख पदाचा दावेदार बनवण्यासाठी तयारीत असलेले दिसत होते. त्यातूनच शिवसेनेतील अंतर्गत नाराजी वाढली. त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाने उचलला. जर २०१९ मध्ये तुम्ही भाजपशी धोकेबाजी केली होती, तर मग २०२२ मध्ये भाजपने त्याचा बदला घेतला त्यात काय चुकले? हे अर्थात इथे आम्ही चुकलो असे उद्धवपंत ठाकरे कधीच मान्य करणार नाहीत.
२०१९ मध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष असूनही आणि निवडणूकपूर्व युती शिवसेने सोबत झाली असताना शिवसेना आणि भाजपला मिळून सत्ता बनवण्याइतक्या जागा मिळाल्या असतानाही भाजपला सत्तेबाहेर बसावे लागले होते. अशावेळी शिवसेनेत अंतर्गत नाराजी आहे हे चित्र स्पष्ट दिसत असेल, तर भाजपने त्याचा फायदा घेतला यात त्यांचे कुठेही चुकलेले नाही. राजकारण हे राजकारण असते. तिथे आलेली संधी उपयोगात आणायचीच असते. तेच देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे भाजपने शिवसेना फोडली, हे जरी मान्य केले तरी उद्धव ठाकरेंच्या चुकांमुळे बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली भक्कम तटबंदी खिळखिळी झाली आणि म्हणूनच शिवसेनेला खिंडार पडू शकले.
असाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही झाला इथे २०१४ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपसोबत जाण्याचा इरादा होताच. मात्र शरद पवारांचेच तळ्यात मळ्यात सुरू होते. २०१९ मध्ये तर अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीही आटोपला होता. तो शपथविधी देखील शरद पवारांच्याच परवानगीने झाला होता. मात्र नंतर त्यांनी माघार घेतली. तोंडघशी मात्र अजितदादा पडले. नंतर त्यांनी महाआघाडी बनवून अजितदादांना उपमुख्यमंत्री केले. मात्र सत्तासूत्र आपल्याच हातात ठेवली होती. २०२२ मध्ये सत्ता गेल्यावर त्यांनी अजित दादांना बाजूला सारत सुप्रिया सुळे यांना म्हणजेच आपल्या कन्येला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आधीपासून दुखावलेले अजितदादा अधिकच दुखावले, आणि त्यांनी बंडाची तयारी केली. त्यावेळी मग नव्या सावजाच्या शोधात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी नेम साधला. त्यात त्यांचे काय चुकले? एक चतुर राजकारणी म्हणून फडणवीसांची खेळी योग्यच होती. अशी खेळी आधी महाराष्ट्रात शरद पवार खेळायचे. मात्र त्यांच्या डोक्यावर हात फिरवणारा कुणीतरी पुढच्या पिढीतला तयार झाला याच्या त्यांना मिरच्या झोपल्या, आणि म्हणून त्यांची ओरड सुरू झाली आहे. आमचाही पक्ष भाजपने म्हणजेच फडणवीस यांनी फोडला असा आरोप ते करत आहेत. मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. या दोघांनीही आपापले पक्ष सांभाळताना जर धृतराष्ट्री भूमिका घेतली नसती आणि पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कारभार चालवला असता, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सुटले, ते त्यांच्या नेत्यांनी केलेल्या चुकांमुळे. हे दोघेही नेते आपापल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तुमचे अहित होऊ देणार नाही असा विश्वास देण्यात ते कमी पडले. या दोघांनीही आपापल्या अपत्यांचे आधी भले कसे करता येईल हाच विचार केला. अपत्यांचे भले जरूर करावे, मात्र ते करत असताना इतरांवर अन्याय होईल असे आपले वर्तन नसावे, आणि आपल्या अपत्यांना त्यांच्या लायकीनुसार द्यावे. तरच त्यांना जे काही मिळाले त्याची किंमत राहते, नाहीतर सर्वच गोंधळ होतो. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष फोडला तो देवेंद्र फडणवीस यांनीच हे उघड आहे .मात्र त्यांना तशी संधी तुऊ निर्माण करून दिली. संधी समोर आल्यावर देखील लाथाडून पुढे जायला फडणवीस देखील काही साधू संन्यासी नाहीत. ते देखील तुमच्यासारखेच राजकारणी आहेत, हे या दोघांनीही लक्षात घ्यायला हवे. या दोघांनीही कठोर आत्मपरीक्षण करून आपण कुठे चुकलो त्याचा विचार करत भविष्यात या चुका दुरुस्त कशा करता येतील हा विचार करावा. तेच त्यांच्या दृष्टीने हिताचे ठरेल.