पनवेल : महानगरपालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या ७५ झोपड्यांवर कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत, सदरची कारवाई पनवेल महानगरपालिकेने करत नागरिकांना मोठा दिलासा आहे.
बेलपाडा गावाजवळ डोंगर परिसरात अनधिकृतरित्या झोपड्या बांधल्या जात असल्याची तक्रार भाजपचे खारघर शहर अध्यक्ष माजी नगरसेवक प्रवीण पाटील, ऍड. अमर उपाध्याय, कीर्ती नवघरे यांनी महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याकडे केली होती. बेलपाडा गावाच्या मागे आणि डोंगराळ भागात उभ्या राहिलेल्या या झोपड्या सहजा नजरेत येत नाही मात्र या भूखंडावर अनधिकृतपणे झोपड्यांचे बस्तान बांधल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत होता. त्यामुळे अशा प्रकारच्या झोपड्यांना आंदण मिळू नये आणि अशा प्रकारामुळे झोपड्यांचे प्रमाण वाढू नये यासाठी अनधिकृत झोपड्यांवर वेळेवर कारवाईची गरज लक्षात घेता माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी महापालिकेचे प्रभारी आयुक्त प्रशांत रसाळ आणि प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्याकडे या संदर्भात तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार आज सकाळी प्रभारी आयुक्त प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त मारुती गायकवाड, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, अतिक्रमण विरोधी प्रमुख रत्नाकर जाधव, स्वच्छता निरीक्षक संदीप भोईर, अतुल मोहोकर आणि ५० कर्मचारी यांनी त्या ठिकाणी तीन जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत झोपडपट्ट्या जमीनदोस्त करत ती जागा पूर्ववत करून नागरिकांना दिलासा दिला आहे. या कारवाईबद्दल माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी समाधान व्यक्त करून प्रभारी आयुक्त प्रशांत रसाळ आणि प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांचे दूरध्वनीवरून आभार मानले आहेत. तसेच अशा कारवाईमुळे अनधिकृतपणे झोपड्यांचा विळखा उभारणाऱ्यांना जरब बसली आहे.