मुंबई : संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीत-नाट्य महोत्सव दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात साजरा झाला. संस्था गेली १५ वर्षे संगीत नाटकांना चांगले दिवस यावेत यासाठी हा महोत्सव आयोजित करत आहे. साहित्य संघाचे संगीत माऊली, गंधर्वभूषण जयराम शिलेदार नाट्यसंस्थेचे संगीत सुवर्णतुला व कलाद्वयी, पुणे या संस्थेचे संगीत मत्स्यगंधा ही नाटके सादर करण्यात आली. रसिकांचा या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. हा महोत्सव विमल ट्रस्ट आणि श्री. दिलीप काटदरे यांनी सहप्रायोजित केला होता.
संगीत माऊली हे नवीन नाटक असून ज्ञानेश्वरांचे आईवडील विठ्ठलपंत आणि रूक्मिणीबाई यांच्या आयुष्याची आणि त्यागाची कहाणी सांगण्यात आली आहे. लेखन, दिग्दर्शन व संगीत या बाजू नेटक्या आहेत. नवीन कलाकारांनी अभिनयाची बाजूही चांगली सांभाळली. संगीत सुवर्णतुला आणि संगीत मत्स्यगंधा ह्या मुळात लोकप्रिय असलेल्या नाटकांनी तर बहार केली. जुने जाणते कलाकार, अप्रतिम गाणी यांनी दोन्ही प्रयोग चांगलेच रंगले. गाण्यांना वन्स मोअरही मिळाले.