ठाणे : राज्यातील वाढत्या उन्हाचा चटका दिवसागणिक असह्य होत असून आता राज्यावर उष्माघाताच्या संकटाची टांगती तलवार डोक्यावर आहे. राज्य उष्माघात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. १ मार्च ते १२ एप्रिल या ४२ दिवसांत राज्यात उष्माघाताने बाधित ७७ रुग्ण आढळून आले. त्यातील ८ ते १२ एप्रिलदरम्यान ३६ रुग्ण आढळले आहेत.
राज्यात पुढील काही दिवसांमध्ये पारा अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांतील तापमान हे ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून नागरिकांना उन्हात न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
सोमवारी ठाणे शहराने उन्हाचा तडाखा अनुभवला. ठाण्यातील पारा ४१.६ अंश सेल्सियसवर पोहोचला. पुढील काही दिवस उष्णतेचा पारा वाढणार असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. प्रादेशिक हवामान विभागाने रविवारी पुढील पाच दिवसांसाठी तापमानाचा अंदाज जारी केला. कोकण विभागात सोमवार ते बुधवार या कालावधीत कमाल तापमानाचा पारा ३ ते ४ अंशांनी वाढून, उष्णता निर्देशांक ४० ते ५० अंशांदरम्यान जाणवू शकेल, असेही स्पष्ट केले. बदलापूर ४२.४, भिवंडीत ४२.३, मुरबाड जवळील धसई येथे ४२.१, कळवा शहरात ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
राज्यात सापडलेल्या उष्माघाताच्या रुग्णांमध्ये बुलढाण्यात सर्वाधिक १२ रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल सिंधुदुर्गामध्ये ९, वर्धामध्ये ८, नाशिकमध्ये ६ आणि कोल्हापूरमध्ये ५ रुग्ण सापडले आहेत. तर सर्वाधिक कमी रुग्णांची नोंद अकोला, भंडारा, गोंदिया, नांदेड, रत्नागिरी, सातारा, उस्मानाबाद व नागपूरमध्ये प्रत्येकी एक इतकी झाली आहे.
उन्हापासून बचावासाठी काय काळजी घ्याल?
१. पुरेसे पाणी प्या, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव्य पदार्थ घ्या.
२. शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळात घरात राहावे.
३. सैलसर व सुती कपडे व शक्यतो पांढरे कपडे वापरावेत.
४. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी.
५. गर्भवती स्त्रिया, वैद्यकीय समस्या असणाऱ्यांनी उन्हात काम करणे टाळावे.