निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांचे प्रतिपादन
ठाणे: सर्व उमेदवारांना व पक्षांना समान संधी मिळण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि अनुचित पद्धतीच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने व समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी आज येथे केले.
24- कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आज सकाळी “सीझर कमिटीच्या” नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती सातपुते यांनी नोडल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून म्हणजे दि. 16 मार्चपासून फिरत्या निगराणी पथकाचे काम सुरू झाले आहे. या टीमने आक्षेपार्ह रोकड, दारू,भेटवस्तू इ.सापडल्यास कशा प्रकारे कारवाई करावी याच्या सूचना संबंधित बैठकीतील उपस्थित समन्वय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे या कार्यवाहीसाठी आयकर विभाग, वस्तू व सेवा कर विभाग, राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभाग या सर्वांचे प्राधिकृत अधिकारी यांचे सहकार्य अपेक्षित आहे. या सर्वांनी त्यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशाही सूचना निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी यावेळी बैठकीत दिल्या.
या बैठकीस 144 कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे सह.निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर, 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली लंभाते, नोडल अधिकारी (खर्च) दिलीप सूर्यवंशी, सहा.खर्च निरीक्षक शरद देशमुख, 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ अंतर्गत असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघाच्या आदर्श आचारसंहिता पथकांचे समन्वय अधिकारी, पोलीस खात्याचे वरिष्ठ प्रतिनिधी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.
