ठाणे : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे गोळीबाज वादग्रस्त भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीरपणे प्रचारात उतरल्याचे मंगळवारी दिसून आले.
श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणी तुरुंगात असलेले आमदार गायकवाड यांनी भाजपचे कार्यकर्ते श्रीकांत यांना साथ देतील अशी भूमिका मध्यंतरी घेतली होती. भाजपाचे डोंबिवलीतील मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कामी मध्यस्ताची भूमिका बजावली होती. असे असताना प्रत्यक्ष प्रचारात मात्र सुलभा गायकवाड या वैशाली दरेकर यांच्यासमवेत दिसून आल्याने कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेमधील दुही पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार गणपत गायकवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यातले वितृष्ठ जगजाहीर आहे. खासदार शिंदे यांचे कट्टर समर्थक महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. महेश गायकवाड यांना खासदार शिंदे यांचे पाठबळ मिळत असल्याने आमदार गणपत गायकवाड गेल्या काही काळापासून अस्वस्थ होते. हि अस्वस्थता इतकी टोकाला पोहोचली आमदार गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेले महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर बरे होऊन महेश गायकवाड सध्या कल्याणात आपल्या घरी परतले आहेत. महेश गायकवाड घरी परतत असताना त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष त्यांचे स्वागत करण्यात आलं.
दरम्यान आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्य समर्थकांमधील टोकाचा वाद अजूनही कायम आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भेटल्या होत्या. या दोघींच्या भेटीमुळे त्यावेळी शिंदे गटात नाराजी व्यक्त केली जात होती.