महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. सध्या महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये लढत होणार आहे. या आघाड्यांमधील जागा वाटपाचे वाद अद्यापही संपलेले नाहीत. दोन्ही बाजूच्या ज्येष्ठ नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. महाआघाडीच्या सांगलीच्या जागेचा असाच तिढा झाला आहे, आणि आज या तिढ्याने काहीसे गंभीर वळण घेतल्याचे जाणवते आहे. हे असेच चालू राहिले तर महाआघाडीत बिघाडी होणार हे नक्की. जरी बिघाडी झाली नाही तरी महाआघाडीच्या उमेदवाराची परिस्थिती डामाडौल होणार हे निश्चित आहे. सांगली लोकसभा क्षेत्राच्या बाबत हा जो तिढा झाला आहे त्याला सकृतदर्शनी तरी शिवसेना उबाठा चे नेतृत्वच जबाबदार असल्याचे चित्र दिसते आहे. सांगली हा जुना काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. इथे वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील असे दिग्गज काँग्रेसचे नेते होऊन गेले. आजही या घराण्याचे इथे वर्चस्व आहे. त्यात वसंतदादा पाटलांचा परिवार आजही काँग्रेस सोबत आहे, तर राजारामबापूंचा परिवार आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत आहे. इथे वर्षानुवर्षापासून काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे, हे आधी नमूद केले आहेच. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडे राहावी अशी महाआघाडीतील काँग्रेसी नेत्यांची इच्छा होती. मात्र इथे काही ठरण्यापूर्वीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे यांनी सांगलीत येऊन चंद्रहार पाटील नामक कुस्तीगीर शिवसैनिकाची उमेदवारी जाहीर करून टाकली.इथूनच वादाला सुरुवात झाली. आज हा वाद अगदी शिगेला पोहोचला आहे. जर सन्मानजनक तोडगा निघाला नाही तर इथे काँग्रेसचा उमेदवार अपक्ष म्हणून लढेल, आणि महाआघाडीच्या उमेदवाराची तो गोची करेल हे स्पष्ट दिसते आहे.
या ठिकाणी काँग्रेसचे विशाल पाटील हे उमेदवार म्हणून रिंगणात येण्यास इच्छुक होते. त्यांच्या साथीला विश्वनाथ विश्वजीत कदम हे राज्य मंत्रिमंडळातील माजी मंत्रीही आहेत. विश्वजीत कदम हे काँग्रेसचे दिग्गज नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत. विश्वजीत आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी विशाल पाटील यांच्यासाठी भरपूर जोर मारला होता. त्यांची उमेदवारी पक्ष नेतृत्वाने मान्यही केली असती. मात्र आधीच शिवसेनेने घोषणा करून टाकल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांची पंचाइत झाली आणि परिणामी परिस्थिती चिघळू लागली.
उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यावर ते थोडे स्वस्थ बसले असते, तर काही हरकत नव्हती. मात्र त्यांनी लगेचच आपले पपेट संजय राऊत यांना पाठवले. संजय राऊत यांनीही सांगलीत जाऊन प्रचाराचा गोंधळ घातला. त्यामुळे तिथले काँग्रेसजन अधिकच अस्वस्थ झाले. तेही जिद्दीला पेटले. इकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे साळसुदासारखे आघाडी धर्माचे धडे सर्वांना देत होते. मात्र आघाडीतील इतर घटकांना विश्वासात न घेता परस्पर आपला उमेदवार जाहीर करत आपणच आघाडी धर्माला तिलांजली दिली हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही विसरले होते.
दरम्यान विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे दोघेही दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटले. महाराष्ट्रातही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार या सर्वांना भेटले. मात्र तोडगा काहीच निघाला नाही. शेवटी वाट पाहून काल विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे. भरीस भर त्यांनी आज प्रचंड शक्ती प्रदर्शन करत पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन काँग्रेसचा उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे पुन्हा आघाडीधर्माच्या गोष्टी सांगत आहेत. आघाडीतील एका पक्षातील कार्यकर्ता जर ऐकत नसेल तर पक्ष नेत्यांची त्याला समजावण्याची जबाबदारी आहे असे तत्त्वज्ञान उद्धव ठाकरे सांगत आहेत. मात्र एखाद्या पक्षाचा नेताच ऐकत नसेल तर त्याला कोणी समजावायचे याचे उत्तर उद्धव ठाकरे देत नाहीत.
उद्धव ठाकरेंची ही दादागिरीच त्यांना अडचणीत आणणारी ठरते आहे. जर इथे त्यांनी सन्मानजनक तडजोड केली नाही तर त्यांचा हा उमेदवार पराभूत होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र आज तरी उद्धव ठाकरे ऐकायला तयार असल्याचे दिसत नाही. उद्धव ठाकरे किंवा एकूणच ठाकरे परिवाराने आजवर केलेल्या दादागिरीमुळेच ते अडचणीत आलेले आहेत. (अर्थात आपण अडचणीत आलो हे ते जाहीर रित्या मान्य करायला तयार नाहीत). मात्र १९८८-८९ मध्ये ज्यावेळी सर्वप्रथम शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी युती केली तेव्हापासून त्यांची कायम दादागिरी सुरू होती. जोवर बाळासाहेब ठाकरे होते तोवर ते दादागिरी करतानाही इतरांना सांभाळून घेत आपला मुद्दा मान्य करून घ्यायचे. तेवढी चतुराई उद्धवपंत ठाकरेंमध्ये नाही. त्यामुळेच त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना आपला मुद्दा पुढे रेटताना परिस्थितीचा साकल्याने विचार करण्याची सवय होती. उद्धवपंतांना तशी सवय नसावी. त्यामुळेच त्यांनी २०१४ मध्ये भाजपशी असलेली २५ वर्ष जुनी युती तोडण्याची वेळ आणली.
१९८८-८९ मध्ये शिवसेना भाजप युती झाली तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ आणि भाजपा लहान भाऊ असे धोरण ठरले होते. त्यात दादागिरी करून जिथे भाजपची ताकद आहे असे अनेक मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे ओढून घेतले. विधानसभेत जागा लढवतांनाही आम्ही मोठे भाऊ म्हणून २८८ पैकी भाजपला फक्त ११७ जागा द्यायच्या आणि उर्वरित जागा आपण लढवायच्या असे सूत्र त्यांनी लागू केले. त्यातही ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री असे सूत्र ठरले होते. जर तुम्ही जास्त जागा लढवल्या आहेत तर सहाजिकच तुमच्या जास्त जागा निवडून येणार आणि मुख्यमंत्री तुमचाच होणार हे निश्चितच होते. परिणामी १९९५ मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. १९९९ मध्ये सत्ता गेली तरी विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे राहिले. २००४ मध्ये ही तीच परिस्थिती होती. २००९ मध्ये शिवसेनेने जास्त जागा लढवूनही त्यांच्या जागा भाजप पेक्षा कमी झाल्या. परिणामी २००९ ते २०१४ या काळात विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे राहिले.
२०१४ मध्ये परिस्थिती पूर्णतः बदलली होती. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले होते. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास शिवसेनेच्या अनेक मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली होती. हा मुद्दा लक्षात घेत भाजपने ११७ पेक्षा जास्त जागा आम्हाला द्याव्या असा आग्रह धरला. मात्र उद्धवपंत एकही जागा सोडायला तयार नव्हते. बऱ्याच चर्चा झाल्या मात्र त्या निष्फळ ठरल्या. परिणामी भाजपने युती तोडली आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपने सर्व जागा लढवून १२२ जागांवर विजय मिळवला, तर शिवसेनेला फक्त ६३ जागांवर थांबावे लागले होते. नंतर भाजपने सरकार बनवले तेव्हा नाक घासत भाजपकडे जाऊन सत्तेत भागीदारी मिळवावी लागली होती. २०१९ मध्ये शिवसेनेने आपली दादागिरी चालवण्यासाठी अचानक युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर अभद्र शय्यासोबत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी बाळासाहेबांच्या खोलीत कधीही न झालेल्या चर्चेची साक्ष ते काढत होते. अर्थात त्याला साक्षीदार कोणीही नव्हते. मात्र आम्हीच खरे या हट्टाने ते पुढे गेले. नंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनले आणि ते फुटले ही तो इतिहास ताजा असल्यामुळे पुन्हा तो उगाळण्यात काही अर्थ नाही. मात्र इथेही शिवसेनेची दादागिरी आडवी आली आणि त्यांना सत्तेबाहेर जावे लागले. त्यांचा भरभक्कम असा वाटणारा पक्षही आज खिळखिळा झालेला दिसतो आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रातील जनता आमच्या पाठीशी आहे अशी त्यांची मुजोरी कायम आहे. आता भाजप सोबत जमणार नाही म्हणून उद्धव ठाकरेंनी शिल्लक राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आघाडी केली आहे. इथेही त्यांची दादागिरी सुरूच आहे. आज काँग्रेस देशातला भाजप खालोखाल मोठा पक्ष आहे. महाराष्ट्रातही त्यांचे निश्चित स्थान आहे. मात्र त्यांना शरद पवारांच्या मदतीने पूर्णतः दाबून टाकत जास्तीत जास्त जागा आपल्याला कशा मिळतील आणि आपले उमेदवार कसे लढवता येतील हाच त्यांचा प्रयत्न आहे. मात्र ते करताना त्या मतदारसंघात आपली इतकी ताकद आहे का हे बघण्याची ही तसदी ते घेत नाहीत. सांगलीचा प्रकार तसाच झाला आहे. विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. पाटील घराण्याचे आजही तिथल्या राजकारणावर आणि काँग्रेसवर वर्चस्व आहे. आज सांगलीतील फार मोठा मतदार त्यांना मानणारा आहे. त्यांना नाराज केले आणि परिणामी त्यांनी असहकार जरी पुकारला तरी महाआघाडीला फक्त सांगलीच काय पण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात जड जाऊ शकते. मात्र उद्धवपंत ठाकरे आणि संजय राऊत हे मानायला तयार नाहीत. आणि त्यांचे गुरु शरद पवार हे त्यांना समजावायला तयार नाहीत, किंवा समजावत असतीलही तरी ठाकरे ऐकायला तयार नाहीत. याचा परिणाम स्पष्ट दिसतो आहे हा वाद जास्त चिघळला तर कदाचित महाराष्ट्रात महाआघाडीचे तुकडे होतील, आणि तसे झाले नाही तर महाराष्ट्रातील बहुसंख्य काँग्रेस समर्थक हे महाआघाडीपासून अप्रत्यक्षरीत्या तरी दूर होतील हे नक्की. देशात आम्हाला मोदीची हुकूमशाही नको म्हणून भाजपचे उमेदवार पराभूत करायचे या हेतूने सर्व मोदी विरोधक एकत्र येत आहेत. मात्र एकत्र येतांना त्यांनी सामंजस्याने काम करणे अपेक्षित आहे. असे असले तरी सामंजस्य आणि शिवसेना यांचे विळा भोपळ्याचे सख्य आहे. त्याचाच परिणाम आज दिसतो आहे. जी दादागिरी वर्षानुवर्ष भाजपसोबत केली, तीच दादागिरी आज उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत करू बघत आहेत. मात्र भाजप हा कॅडर बेसवर काम करणारा पक्ष होता. काँग्रेसचे तसे नाही. त्याचे परिणाम आज दिसतच आहेत. हे असेच चालू राहिले तर भाजपचे अबकी बार पैतालीस पार हे स्वप्न साकार व्हायला अप्रत्यक्ष मदत होणार आहे. मात्र हे लक्षात कोण घेतो? शिवसेनेने त्यांची अशीच दादागिरी सुरू ठेवली तर मोदींना सत्तेपासून रोखण्याचे त्यांचे स्वप्न कधीच साकार होणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे. सध्या पत्र परिषदा घेऊन उद्धवपंत या देशात पुन्हा मोदींचे सरकार येणार नाही अशा वल्गना करत आहेत. मात्र त्यांची दादागिरी अशीच सुरू राहिली तर या सर्व पोकळ वल्गनाच ठरणार आहेत. हे त्यांनी लक्षात घेऊन या दादागिरीला कुठेतरी आवर घालायला हवा इतकेच सुचवावेसे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *