यवतमाळ : अवघ्या महाराष्ट्रात निवडणूकीची धामधूम सुरु असतानाचा बळीराजाच्या आत्महत्येचे सत्र काही थांबात थांबत नाही. सततच्या नापिकीमुळे वाढत गेलला कर्जाचा डोंगर आणि आजारपणाला कंटाळून कर्जबाजारी शेतकरी दांपत्याने आत्महत्या केल्याची घटना यवतमाळमध्ये घडलीय.
यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील डेहनी शेत शिवारात ही घटना घडलीय. किशोर बाळकृष्ण नाटकर (45) आणि पत्नी वनिता किशोर नाटकर (40) असे मृत दाम्पत्याचे नाव आहेत. मृतक दाम्पत्य हे सकाळी 7 वाजताच्या सुमारास शेतात कापशी काढण्यासाठी घरून निघाले. शेताच्या वाटेतच वामन दिघ्घलवार यांचे शेत असुन त्यांचे विहीरीवरुनच डेहणी गावाला पाणी पुरवठा होता. याच विहिरीत दोघांनीही उडी घेऊन आत्महत्या केलीय. ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत नाटकर हे विहिरीकडे गेले असता, त्यांना दोन मृतदेह विहीरीत तरंगत असल्याचे दिसले. घटनेचा माहिती मिळताच आर्णी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह गावक-यांच्या मदतीने बाहेर काढुन पंचनामा केला. तेव्हा दोन्ही मृतदेह नाटकर दांपत्याचे असल्याचे निदर्शनास आले.
प्राप्त माहितीनुसार, मृतक किशोर बाळकृष्ण नाटकर यांच्यावर विविध बँकांचे कर्ज असल्याचे बोलल्या जात आहे. तसेच किशोर कुटुंबामध्ये सगळ्यात मोठे असून ते पूर्णत: शेतीवर अवलंबून होते. त्यांचाकडे स्वत: च्या मालकीची सहा एकर कोरडवाहू शेती आणि तिला जोड म्हणून गावातीलच दहा एकर ओलिताची शेती त्यांनी मक्त्याने घेतली होती. मात्र, मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतीत सातत्याने अपयश आले. परिणामी कर्जाचा डोंगर वाढत गेला. त्यावरही मात करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले. मात्र त्यानंतरही प्रामाणिक कष्ट निष्फळ ठरले. सोबतच कौटुंबिक जबाबदारी आणि सततच्या नापिकीच्या चक्राने होतं नव्हतं ते सारे हिरावलं. त्यातून आवाक्या बाहेर वाढत चाललेल्या कर्जाचा भाराखाली नाटकर दांपत्याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपविलीय. मात्र त्यांच्या या कृतीमुळे नाटकर कुटुंबीयांवर मोठी शोककळा पसरली आहे.
००००००००००००००००००००००००