धाराशिव : उध्दव ठाकरे शिवसेना गटाच्या ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिमध्ये आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या शक्तीप्रदर्शनात महाराष्ट्र विकास आघाडीची युवा ब्रिगेड प्रचारता उतरली होती. यात ठाकरे सेनेचे आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहीत पवार आणि काँग्रेसचे अमित पवार यांचा समावेश होता.
यावेळी अमित देशमुख यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं नाव घेत अमित देशमुख यांनी हा आरोप केला आहे. तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुनही अमित देशमुख यांनी भाजपावर टीका केली आहे. महाराष्ट्रात महायुतीत कोण कोणत्या पक्षात आहे? कोण कुणाचा अर्ज भरणार आहे, कोण कुणाचा प्रचार करणार आहे? कुणाच्या तिकिटावर कोण उभं राहणार आहे काहीही कळायला मार्ग नाही. भाजपाने फोडाफोडी केली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात भाजपाने फोडाफोडी केली. जी काही फोडाफोडी झाली त्यावरुन आपल्याला वाटत होतं की भाजपाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या संपवायचं आहे. मात्र महायुतीत आत्ता जे काही चाललं आहे त्यावरुन भाजपाचा खरा कट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात असल्याचंच वाटतं आहे असंही अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाने ज्यांना मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली ते कमी जागा लढवत आहेत आणि जे पक्ष खोटे ठरवले आहेत ते जास्त जागा लढवत आहेत. आमच्या हाती एक सर्व्हे आला आहे. त्यानुसार राज्यात महाविकास आघाडीला ३९ तर महायुतीला अवघ्या ९ जागा मिळतील असं चित्र आहे असंही यावेळी अमित देशमुख म्हणाले.