निवडणूक प्रचारासंदर्भातील परवान्यांसाठी
ठाणे – लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवाने घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहा विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. उमेदवाराच्या प्रचारासाठी आवश्यक त्या सर्व परवाने घेणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता प्रचार केल्यास नियमानुसार कारवाई करणार असल्याचे 23, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी सांगितले.
23, भिवंडी लोकसभा मतदारसंघा अंतर्गत सर्व प्रमुख राजकीय पक्ष प्रतिनिधी यांची स्थायी समिती स्थापन करण्यात आली आहे. सध्या उमेदवार नसल्याने राजकीय पक्ष प्रतिनिधी स्तरावर आज बैठक घेण्यात आली. त्यावेळी 23, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव बोलत होते. 23, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधीत पोलीस अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी सर्व प्रमुख राजकीय पक्षीय प्रतिनिधी यांना सांगितले की, नामनिर्देशन पत्र भरताना अचूक भराव, तसेच नामनिर्देशन भरताना सोबत जोडावयाचे प्रतिज्ञापत्रे भरताना सर्व तपशील व्यवस्थित पूर्ण भरावे. उमेदवारांने त्यांचे अलिकडील काळात काढलेले तीन छायाचित्रे नामनिर्देशन अर्जा सोबत घेवून येणे अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार उमेदवार व राजकीय पक्षाने तीन वेळा प्रिंट मिडीया व इलेक्ट्रानिक मिडिया मधून उमेदवाराच्या माहितीचे जाहीर प्रकटन करणे आवश्यक आहे. निवडणुकीसाठी उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते उघडावे व त्या खात्यातून सर्व निवडणूक खर्च करावा. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा 95 लाख आहे. उमेदवाराने केलेला सर्व खर्च केंद्रीय निवडणूक निरिक्षक तपासणार आहेत. उमेदवाराची प्रचार सभा, रॅली आदी सर्वांचे छायाचित्रिकरण करण्यात येणार आहे. उमेदवाराला प्रचारासाठी लागणारी सर्व प्रकारची वाहने वापरण्यासाठी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक वाहनाचा खर्च हा स्वतंत्रपणे दाखवणे आवश्यक आहे.
सर्व प्रकारच्या परवानगी घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात तसेच सर्व सहा ही सहा.निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. सर्व प्रकारचे परवाने घेण्यासाठी किमान तीन दिवस आगोदर अर्ज करणे आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या निकषावर सर्व परवाने देण्यात येतील. उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी ईव्हीएम मशीन आणते वेळी, स्ट्राँग रूम मध्ये ठेवताना उपस्थित राहू शकतात. कोणत्याही प्रकारचे प्रचार साहित्य प्रसिध्द करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच समाज माध्यम (सोशल मिडीया) व इलेक्ट्रानिक मिडीयावर प्रचार करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मा. जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता कोणत्याही प्रकारच्या प्रचाराचे साहित्य प्रसिध्द करण्यात येऊ नये. तसेच कोणतीही परवानगी नसताना वाहन वापरता येणार नाही. तसेच कोणताही प्रचार करताना जर नियमांचे व कायद्यांचे उल्लघंन झाल्यास त्या उमेदवार व पक्षावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही निवडणूक 23, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी यावेळी सांगितले.