मुंबई: 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्याच्या महिनाभरानंतरच माझ्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली, माझी ओपन हार्ट सर्जरी झाली होती. पण त्यावेळी शिवसेनेतील एकाही नेत्याने माझ्याकडे ढुंकून पाहिले नव्हते, पक्षप्रमुखांचा साधा फोनही आला नव्हता, अशी खंत पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी व्यक्त केली. ते मंगळवारी एबीपी माझाच्या ‘तोंडी परीक्षा’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विजय शिवतारे यांनी उद्धव ठाकरे  यांच्या नेतृत्वशैलीविषयीची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली.

यावेळी विजय शिवतारे यांनी त्यांच्या आजारपणातील एक प्रसंग सांगितला. आजघडीला राजकारणात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे ठराविक लोक सोडले तर इतर नेते आपले कार्यकर्ते, आमदार किंवा मंत्र्यांची काळजी घेत नाहीत. मी विधानसभा निवडणुकीत पडल्यानंतर एक महिन्यातच माझी सर्जरी झाली होती. माझं मोठं ऑपरेशन झालं. पण त्यावेळी माझ्या पक्षातील (शिवसेना) कोणीही माझ्याकडे ढुंकून पाहिलं नाही. त्यावेळी चारवेळा मला भेटायला कोण आले तर एकनाथ शिंदे आले. सतत बोलायला आणि बारकाईने लक्ष द्यायला कोण होते, तर ते देवेंद्र फडणवीस होते, असे विजय शिवतारे यांनी सांगितले.

 पण मी ज्या पक्षात (शिवसेना) होतो, त्या पक्षाच्या प्रमुखांचा साधा फोनही आला नाही. उद्धव ठाकरेच काय शिवसेनेतील एकाही नेत्याने माझ्याकडे लक्ष दिले नाही. मी ज्या रुग्णालयात होतो तेव्हा तिकडे अनिल देसाई आले होते. मी आयसीयूमध्ये असताना अनिल देसाईंचा आवाज ओळखला. पण अनिल देसाई हे रुग्णालयात दुसरं कोणालातरी भेटायला आले होते. मी आयसीयूमध्ये 7 दिवस व्हेंटिलेटरवर असताना शिवसेनेचा एकही नेता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. राजकारणात तुम्ही लोक सांभाळले, कार्यकर्त्यांची काळजी घेतली तरच तुम्ही नेते होऊ शकता, असेही विजय शिवतारे यांनी म्हटले.

एकनाथ शिंदेंच्या फ्लोअर मॅनेजमेंटमुळे महायुतीचा कोल्हापूरचा उमेदवार निवडून येईल: विजय शिवतारे

निव्वळ माझ्या पक्षाचा आमदार आहे म्हणून त्याला गुलामाप्रमाणे वागवून चालवत नाही. आज कोल्हापूरमध्ये धैर्यशील पाटील आणि संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदे संपूर्ण दिवस मेहनत घेत आहेत, भेटीगाठी घेऊन फ्लोअर मॅनेजमेंट करत आहेत. त्यामुळे कोल्हापुरात महायुतीचा उमेदवार 100 टक्के निवडून येईल, असा दावा विजय शिवतारे यांनी केला. कार्यकर्ते, आमदार, खासदार सांभाळले आणि लोकांची काळजी घेतली तरच तुम्ही नेते होऊ शकता. आता लाटेवर निवडून येण्याचे दिवस गेले, असे विजय शिवतारे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *