मुंबई :ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे व्हॅक्युम क्लीनर आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यातील भ्रष्ट्राचारी शोधून आपल्या पक्षात ते ओढून घेत आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
निवडणूक रोखे हा जगातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे, याला मोदी गेट असं नाव दिलंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मशाल गीत लाँच झालं, त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हटलं की, काँग्रेसने जाहीरनामा जाहीर केलेला आहे. आता राज्यातील मुद्दे घेऊन संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करू, असंही त्यांनी सांगितलं आहे. संयुक्त सभा सुद्धा आम्ही लवकरच घेऊ, निवडणूक आहे त्यामुळे गरज असेल तर, वेगळा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध करू, असंही ठाकरे म्हणालेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूक रोखे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने समोर आणलं आहे. निवडणूक रोखे हा जगातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे, याला मोदी गेट असं नाव दिलंय. आता विरोधक यांना पच्छाताप होईल, कारण हे प्रकरण आधी समोर का आला नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
सांगलीतून काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना, याचा महायुतील फटका बसणार नसल्याचं ठाकरेंनी म्हटलंय. विशाल पाटील निवडणूक लढावत असतील तर, त्याचा फटका बसणार नाही. जागावाटप झालेलं आहे,जर बंडखोरी होत असेल तर, त्या-त्या पक्षाने संबंधित नेत्यांना समजून सांगितलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.