उल्हासनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त उल्हासनगर महानगरपालिका व द युनिक अकॅडमी,कल्याण यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा परीक्षा यूपीएससी आणि एमपीएससीकरिता मोफत मार्गदर्शन कार्यशाळा तसेच एमपीएससीमधुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व अनुभव कथन सभारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख व प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.आकाश मनोरे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी MPSC मधून निवड झालेले विद्यार्थी मयूर रसाळ (पोलीस उप अधीक्षक), दिक्षा पाटील (सहायक गटविकास अधिकारी), राधिका रसाळ (उप शिक्षण अधिकारी), आदेश तरे (पोलिस उप निरीक्षक), सागर मोरे (पोलिस उप निरीक्षकI) उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रम शुक्रवार 19 एप्रिलला सकाळी 10 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, जवाहर हॉटेल शेजारी,सेंट्रल हॉस्पिटल रोड,उल्हासनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी उल्हासनगर व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती महापालिकेने केली आहे. अधिक माहितीसाठी :9321174100 या नंबरवर संपर्क साधावा.
प्रविण तरडे आणि मंगेश देसाई यांच्या शुभहस्ते
“अप्सरा” या चित्रपटाचे म्युझिक लाँच
राजेंद्र साळसकर
सूर निरागस हो, माझा आनंद हरपला अशा उत्तमोत्तम गाण्यांचे गीतकार मंगेश कांगणे यांनी संगीतकार क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे. आगामी “अप्सरा” या चित्रपटातील गाणी मंगेश कांगणे यांनी संगीतबद्ध केली असून या निमित्ताने गीतकाराने संगीतकार होण्याचा दुर्मिळ योग साधला गेला आहे. लेखक,दिग्दर्शक ,अभिनेता प्रवीण तरडे आणि अभिनेता मंगेश देसाईं यांच्या शुभहस्ते “अप्सरा या चित्रपटाचे म्युझिक लॉन्च एका समारंभाद्वारे नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाची संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या १० मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, सुनिल भालेराव यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा लिहिली असून या चित्रपटाचे दिग्दर्शनही पवार यांनीच केलं आहे. मंगेश कांगणे हे गेली अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या लेखणीनं अनेक हिट गाणी मराठी चित्रपटांना दिली आहेत. त्या शिवाय अनेक म्युझिक अल्बमसाठीही त्यांनी गाणी लिहिली आहेत.भावगर्भ, सहजपणे तोंडी रुळणारी शब्दरचना, व्यक्तिरेखेची नेमकी अभिव्यक्ती, कथानकाची नेमकी गरज ओळखून गीतलेखन करण्यामध्ये मंगेश कांगणे माहीर आहेत. आता गीतलेखनाच्याही पुढे जात मंगेश यांना सुरांचीही साथ लाभली आहे.
आपल्या चित्रपट क्षेत्रातील यशस्वी कारकीर्दीबाबत बोलताना मंगेश कांगणे म्हणाले की, २०१३ मध्ये माझी पहिली फिल्म दुनियादारी आली आणि त्यातील” टिकटिक वाजते डोक्यात” या माझ्या पहिल्याच गीताला रसिक प्रेक्षकांचे अफाट प्रेम मिळाले. आज जवळपास १० वर्षांहून अधिक वर्ष या क्षेत्रात काम करुन जवळपास १२५ हून अधिक चित्रपटांसाठी मी काम केले आहे. अनेक दिग्गज लोकांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. खुप नवनवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या. यातूनच आपणही संगीतकार म्हणून या क्षेत्रात पाऊल टाकावे यासाठी मी उत्सुक होतो आणि “अप्सरा” च्या निमित्ताने मला ही संधी चित्रपटाचे निर्माते सुनील भालेराव आणि दिग्दर्शक चंद्रकांत पवार यांनी मला दिली यासाठी मी त्यांचा आभारी आहे.
“अप्सरा” चित्रपटातील तीन गाणी मंगेश कांगणे यांनी केली आहेत. या तीनही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले आहे. गायक अभय जोधपूरकर गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरुप, भैय्या मोरे, मेघा मुसळे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत. सुयश झूंजुरके,मयूरी आव्हाड,मेघा घाडगे,अक्षता पाडगावकर, शशांक शेंडे, विट्ठल काळे विजय निकम, मयूर पवार, राजेश भोसले, आशिष वारंग आदी कलाकारांच्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी कॅमेरामन, निलेश राठोड यांचं संकलन तर सुबोध आरेकर, इमरान मालगुणकर, कृतिक माजिरे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम उत्तम पाहिले आहे.
अप्सरा चित्रपटात एक अनोखी प्रेम कथा अतिशय रंजकपणे मांडण्यात आली असून अप्सरा कोण असेल हे समजून घेण्यासाठी आपल्याला अजुन थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आजवर गीतकार म्हणून हिट गाणी नावावर केलेल्या मंगेश कांगणे यांच्या नावावर संगीतकार म्हणून ही हिट गाणी जोडली जातील यात शंका नाही۔