ठाणे : घोडबंदर येथील कापूरबावडी उड्डाणपूलावरील वाहतुक दुरूस्ती कामासाठी बंद करण्यात आल्याने बुधवारी सकाळी त्याचा परिणाम घोडबंदर मार्गावर झाला. कापूरबावडी ते पातलीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. या वाहतुक कोंडीमुळे वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहतुक करण्यास सुरूवात केली. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडली.
मुंबई नाशिक महामार्ग, ढोकाळी-हायलँड रोड येथील वाहतुकीवरही याचा परिणाम झाला . वाहतुक कोंडीसोबत उन्हाचा फटका चालकांना सहन करावा लागत .
घोडबंदर मार्गावरून हजारो वाहने दिवसाला ठाणे, भिवंडी, नाशिक आणि मुंबईच्या दिशेने वाहतुक करतात. अवजड वाहने येथील कापूरबावडी उड्ड्डाणपूलावरून प्रवेश करून वाहतुक करतात. या उड्डाणपूलावरील रस्त्याला जोडणारी लोखंडी पट्टी बदलण्याचे कार्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंगळवारी रात्री हाती घेण्यात आले होते. परंतु या पट्टीवरील सिमेंट  सुकलेले नव्हते.. त्यामुळे बुधवारी सकाळी देखील हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. येथील उड्डाणपुलाखालून वाहतुक सोडण्यात आली. त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर झाला.
घोडबंदरहून हजारो नोकरदार ठाणे, मुंबई, भिवंडीच्या दिशेने वाहतुक करतात. परंतु या वाहन चालकांना कोंडीत अडकावे लागले. त्यामुळे कापूरबावडी ते पातलीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या . काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास सुरूवात केली. त्यामुळे कोंडीत भर पडली. पर्यायी मार्ग म्हणून काही वाहन चालकांनी ढोकाळी, हायलँड मार्गाचा पर्याय निवडला. येथीही कोंडीचा सामना सहन करावा लागला. कोंडीमुळे मुंबई नाशिक महामार्गाची वाहतुक रोखली गेली. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावरही भार वाढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *