ठाणे : महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम असल्याने अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून नवी मुंबईतील भाजप नेते संजीव नाईक यांना उमेदवारी नको असा आग्रह धरलाय. तर उमेदवारीच्या या शर्यतीत आता ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकरांचे नावही आले आहे.
 जाहीर कार्यक्रमांमधून ही जागा शिवसेनेलाच मिळायला हवी यासाठी आक्रमक भूमीका घेणाऱ्या पक्षातील ठाणे, नवी मुंबईतील नेत्यांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत ठाण्यासाठी शेवटपर्यत प्रयत्न कराच मात्र एक पाउल मागे जायची वेळ आलीच तर नाईकांऐवजी भाजपच्या ठाण्यातील नेत्यांसाठी आग्रह धरायला हवा, अशी भूमीका या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्याचे वृत्त आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचे मानला जाणाऱ्या ठाणे लोकसभेच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेनेतील बंडानंतर शिंदे यांच्यासोबत आलेल्या १३ खासदारांपैकी काहींची उमेदवारी भाजपच्या दबावापुढे मुख्यमंत्र्यांना नाकारावी लागली आहे. ठाणे. नाशीक, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, संभाजीनगर, दक्षिण मुंबई या मतदारसंघावरुनही या दोन पक्षात रस्सीखेच सुरु आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून मु्ख्यमंत्री पुत्र डाॅ.श्रीकांत हेच उमेदवार असतील अशी घोषणा मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ठाण्याचा तिढा कायम असताना डाॅ.श्रीकांत यांची उमेदवारी जाहीर करुन उपमुख्यमंत्र्यांनी शिंदेसेनेची कोंडी आणखी वाढवली अशीच चर्चा मुख्यमंत्री समर्थकांमध्ये आहे. स्वत: श्रीकांत शिंदे यांनी अजूनही आपली अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही आणि आमच्या पक्षाकडूनच ती होईल, अशी भूमीका घेत भाजपला अप्रत्यक्ष टोला लगाविल्याची चर्चा आहे. असे असताना ठाण्यासाठी गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांच्या नावाचा भाजपने धरलेल्या आग्रहामुळे शिंदेसेनेतील अस्वस्थता टोक गाठू लागली असून ठाणे शहरातील पक्षाच्या ठराविक नेते, पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंबंधी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
भाजपचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी गेल्या आठवड्यात पत्रकारांशी बोलताना लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले. केळकर यांनी प्रथमच लोकसभा लढविण्याची इच्छा प्रदर्शित केल्याने येथील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपकडून ठाण्यासाठी संजीव नाईक यांचे नाव सतत चर्चेत असताना केळकर यांच्या भूमीकेचे शिंदे सेनेकडून स्वागतच करण्यात आल्याने मुख्यमंत्री समर्थकांची यासंबंधीची भूमीका स्पष्ट होऊ लागली आहे. ठाणे लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे जाता कामा नये आणि तशी वेळ आलीच तर उमेदवार हा ठाण्याचा असावा यासाठी प्रयत्न करा, असे आर्जव मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या पक्षातील ठाण्यातील काही नेत्यांनी केल्याचे सांगण्यात येते. नाईक का नकोत याविषयीच्या कारणांची सविस्तर मांडणीच या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे केल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *