राज्यरंग
नवीन महाजन
जागावाटपावरून भारतीय जनता पक्ष आणि बीजू जनता दलाची युती तुटली. येथे काँग्रेसनेही उमेदवार दिले असले, तरी खरी लढत भाजप आणि बीजू जनता दलामध्ये होणार आहे. दलबदलूंना येथे मोठ्या प्रमाणात उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने आव्हान दिले असले आणि बीजू जनता दलात उत्तराधिकार्यावरून वाद असला तरी येथे बीजू जनता दलच बाजी मारण्याची शक्यता आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाच वेळी पार पडत असल्यामुळे ओडिशामध्ये निवडणुकीचे रण तापले आहे. राज्यात विधानसभेच्या १४७ जागांसाठी चार टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. १३, २० आणि २५ मे तसेच एक जून रोजी चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. युती न झाल्याने सर्व विधानसभा जागांवर भाजप आणि बीजेडी आमनेसामने आहेत. अर्थात काँग्रेसही निवडणुकीच्या रिंगणात आहे. सर्वांच्या नजरा हिंजली या जागेवर आहेत. तिथे भाजपचे शिशिर मिश्रा यांच्या विरोधात मुख्यमंत्री नवीन पटनायक निवडणूक लढवत आहेत. ओडिशा विधानसभेतील विरोधी पक्षनेते जयनारायण मिश्रा यांना संबलपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. बीजेडीने आतापर्यंत ९९ जागांसाठी तर भाजपने ११२ जागांसाठी आणि काँग्रेसने ७५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ओडिशामध्ये लोकसभा निवडणूक चार टप्प्यांमध्ये होणार आहे. राज्यात विधानसभेत बीजू जनता दलाचे बहुमत आहे. भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहर्यावर लोकसभा निवडणूक लढवत आहे. याआधी दोन्ही पक्षांमध्ये युतीची चर्चा होती; मात्र अखेरच्या क्षणी ही चर्चा संपुष्टात आली. भाजप लोकसभेत जास्त जागांची मागणी करत होता तर विधानसभेत बीजेडीला मोठ्या भावाचा दर्जा देण्याची ऑफर दिली होती; परंतु पटनायक यांनी त्याला नकार दिला. बीजू जनता दल आणि भाजपने लोकसभेच्या सर्व २१ जागांवर उमेदवार उभे केले. काँग्रेसही रिंगणात आहे. त्यामुळे निवडणूक तिरंगी झाली आहे.
या निवडणुकीत भाजपने धर्मेंद्र प्रधान, संबित पात्रा आणि जुआल ओराव या जुन्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय बीजू जनता दल सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या भर्तृहरी महताब यांच्यासारख्या नेत्यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. बीजू जनता दलाने पुरी आणि कटक लोकसभा जागांसह अनेक भागात उमेदवार बदलले आहेत. ओडिशाच्या केंद्रपारा लोकसभा मतदारसंघातील बीजू जनता दलाचे खासदार अनुभव मोहंती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत दोन माजी आमदारांसह अन्य काही नेत्यांनी पक्षात प्रवेश केला. मोहंती यांनी बीजू जनता दलाचा राजीनामा दिला. गेल्या महिनाभरात चार विद्यमान आमदार आणि अंदाजे तेवढ्याच माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय भर्तृहरी महताबसारखे ज्येष्ठ खासदारही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ते सहा वेळा खासदार राहिले आहेत. भाजप त्यांना कटकमधून उमेदवारी देऊ शकते. आता अनुभव मोहंती यांनी पक्षात प्रवेश केला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. अशा स्थितीत ओडिशामध्ये जवळपास अडीच दशके सत्तेवर असलेल्या नवीन पटनायक यांच्यासाठी आमदार, खासदारांचे पक्षांतर हा चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीत अनेक बडे नेते नवीन पटनाईक यांना सोडून भाजपमध्ये का जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ओडिशामध्ये फार पूर्वीपासूनच भाजपची फारशी ताकद नव्हती. तथापि, २०१४ पासून पक्ष ओडिशामध्ये विस्तारला. आहे. याशिवाय संबित पात्रा, धर्मेंद्र प्रधान, बैजयंत जय पांडा या नेत्यांना पदोन्नती देऊन वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बैजयंत जय पांडा बीजू जनता दलातून भाजपमध्ये आले आहेत. त्यांनी बंडखोर नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जात आहे. भाजप आणि बीजू जनता दलामध्ये युती न झाल्याने अनेक नेत्यांचे पक्षांतर सुरू आहे. भर्तृहरी महताब यांच्यासारखे नेते बीजू जनता दलाच्या स्थापनेपासून पक्षात होते. त्यांचे जाणे नवीन पटनायक यांच्यासाठी मोठा धक्का आहे. ओडिशाच्या राजकारणातील तज्ज्ञांच्या मते यामागील मुख्य कारण म्हणजे उत्तराधिकारी पदाचा संघर्ष. नवीन पटनायक यांना त्यांचा राजकीय वारसा सुपूर्द करता येईल, असे कोणतेही कुटुंब नाही. आता त्यांचे वय वाढत आहे आणि माजी आयएएस व्ही. के. पांडियन त्यांच्याशी साधत असलेली जवळीक पाहता अनेक नेते अस्वस्थ आहेत. पांडियन सर्व महत्त्वाचे निर्णय घेतात आणि इतर ज्येष्ठ नेत्यांचे मत पूर्वीसारखे गांभिर्याने घेतले जात नाही. त्यामुळे जुने नेते भविष्याबाबत असुरक्षित आहेत. त्याच वेळी ते सतत मजबूत होत असलेल्या भाजपकडे स्वतःसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून पाहत आहेत. अशा प्रकारे बीजू जनता दलातील कठीण भवितव्य आणि भाजपमधील सुरक्षित भविष्य पाहून नेते पळ काढत आहेत.
सहा वेळा खासदार राहिलेले भर्तृहरी यांनी यासंदर्भात बोलतानासांगितले की आता त्यांचा बीजेडीबाबत भ्रमनिरास झाला आहे. पटनायक यांना का सोडले हे सांगताना ते म्हणाले, की १९९७ मध्ये आम्ही स्थापन केलेला बीजू जनता दल आता राहिला नाही. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये भ्रष्टाचार आणि बलात्काराचे आरोप असलेल्यांनाही तिकीट मिळत आहे. सत्तेत आल्यानंतर नवीन पटनायक सर्व नेत्यांचा सल्ला घेत असत आणि राजकीय सल्लागार समिती स्थापन करण्यात आली होती. आता अशी समितीच अस्तित्वात नाही. आता आदेश येतात आणि त्यांचे पालन करावे लागते. लोकसभा निवडणुकीदरम्यान नेत्यांचे पक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या काही निवडणुकांपासून पक्षांतर करणार्यांना जनतेने धडा शिकवायला सुरुवात केली आहे; तरीही नेते काही पक्ष बदलण्याचे थांबवत नाहीत आणि पक्षही दलबदलूंना प्राधान्याने उमेदवारी देतात. यामध्ये प्रादेशिक पक्ष आणखी पुढे असल्याचे दिसत आहे. बीजू जनता दलाने विधानसभा निवडणुकीसाठी नऊ उमेदवारांची चौथी यादी आणि लोकसभा निवडणुकीसाठी एक उमेदवार जाहीर केला. बीजू जनता दलाने भाजपमधून आलेल्या लेखश्री सामंत सिंगर यांना बालासोर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. लेखश्री या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा होत्या. त्या मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर जोरदार टीका करत असत; पण तिकीट मिळण्याच्या अवघ्या चार दिवस आधी त्या राज्यातील सत्ताधारी बीजू जनता दलात सामील झाल्या.
पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजू जनता दलाने लोकसभा निवडणुकीसाठी आठ दलबदलू उमेदवार उभे केले आहेत. ते भाजप आणि काँग्रेसमधून आले होते. अद्याप कोणत्याही पक्षाने विधानसभा मतदारसंघांची संपूर्ण यादी जाहीर केलेली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बीजू जनता दलाला बारा जागा मिळाल्या होत्या. भाजपने आठ, तर काँग्रेसने एक जागा जिंकली होती. बीजू जनता दलाने बालासोरमधून लेखश्री सामंतसिंह यांना केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार प्रताप सारंगी यांच्या विरोधात रिंगणात उतरवले आहे. त्याच वेळी, केंद्रपारा येथे काँग्रेसचे माजी नेते अंशुमन मोहंती हे बीजू जनता दलाकडून भाजपच्या बैजयंत जय पांडा यांच्या विरोधात लढतील. पांडा यांनी २०१८ मध्ये बीजू जनता दल सोडले. गेल्या निवडणुकीत बीजू जनता दलाच्या अनुभव मोहंती यांच्याकडून पांडा यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. बीजू जनता दलाने नबरंगपूरमधून काँग्रेसचे माजी खासदार प्रदीप मांझी यांना उमेदवारी दिली आहे. मांझी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर ही जागा जिंकली होती. मांझी २०२१ मध्ये बीजू जनता दलात दाखल झाले. काँग्रेसचे आमदार सुरेश राउत्रे यांचे चिरंजीव मन्मथ राउत्रे हे भुवनेश्वरमधून भाजप खासदार अपराजिता सारंगी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. ३८ वर्षे काँग्रेससोबत राहिल्यानंतर बीजू जनता दलात प्रवेश केलेल्या सुरेंद्रसिंग भोई यांना बलांगीर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत विविध पक्षांच्या १९५ उमेदवारांसह आठ हजारांहून अधिक उमेदवार रिंगणात होते. म्हणजेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण उमेदवारांपैकी २.४ टक्के पक्षांतर करणारे उमेदवार होते. या १९५ पैकी केवळ २९ नेते विजयी झाले होते. मागील निवडणुकीत त्यांच्या यशाचे प्रमाण १४.९९ टक्के होते. दोन निवडणुकांपूर्वी दलबदलू नेत्यांच्या यशाचे प्रमाण जवळपास दुप्पट होते. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत दलबदलू उमेदवारांच्या यशाचा दर २६.२ टक्के होता.
(अद्वैत फीचर्स)