पनवेल : तळोजा येथील सेक्टर ३४ व ३६ येथील महागृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थ्यांनी बुधवारी सकाळी बेलापूर येथील सिडको भवनासमोर एकत्र येऊन त्यांची व्यथा प्रसारमाध्यमांसमोर मांडली. तळोजातील महागृहनिर्माण प्रकल्पामध्ये सोडत प्रक्रियेमध्ये लाभार्थी ठरलेले साडेचार हजार सदनिकाधारकांना वेळोवेळी आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली जाते. या लाभार्थ्यांची मूळ मागणी घरांचा ताबा आणि झालेल्या आर्थिक नूकसानाची भरपाई मिळणे ही आहे. रामनवमी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सिडको भवन बंद असताना अचानक झालेल्या गर्दीमुळे सिडकोत नेमके काय झाले, याची चर्चा परिसरात होती.
सिडको महामंडळाने अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २०१९ ला तळोजा वसाहतीमधील सेक्टर ३४ व ३६ मधील भूखंडांवर ७९०५ घरांचा महागृहनिर्माण प्रकल्पासाठी सोडत जाहीर केली. यामध्ये लाभार्थ्यांची निवड केली, मात्र लाभार्थ्यांकडून सर्व रक्कम घेऊनही घरांचा ताबा सिडको मंडळाने न दिल्याने सदनिकाधार संतापले आहेत. ताबा न मिळाल्याने बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते आणि सध्या राहत असलेल्या घराचे घरभाडे असा अवाजवी खर्चाच्या कचाट्यात हे लाभार्थी अडकले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात मावळचे खा. श्रीरंग बारणे यांनी सिडको महामंडळाच्या तत्कालिन व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत लाभार्थ्यांचे नूकसान भरपाईचा प्रस्ताव बनविण्याचे सिडकोने मान्य केल्याची माहिती खा. बारणे यांनी दिली. परंतू त्यानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांची बदली झाली. सदनिकाधारकांनी सिडकोत संबंधित प्रस्तावाची माहिती घेतल्यावर प्रत्यक्षात असा कोणताही प्रस्ताव बनविण्याचे काम सूरु नसल्याचे उजेडात आल्याने विद्यमान सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सदनिकाधारकांनी सिडको भवन येथे एकत्र होण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्र्यांनी उलवे येथील सदनिकाधारकांप्रमाणे तळोजातील सेक्टर ३४ व ३६ मध्ये महागृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकाधारकांना नूकसान भरपाई देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी या सदनिकाधारकांची आहे. सध्या हे लाभार्थी हवालदील झाले असून यातील एका लाभार्थ्यांने चिंतेच्या भरात आत्महत्या करण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याचे पत्र सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांना लिहिले आहे. सिडको मंडळाने या सदनिकाधारकांना मे २०२४ ही नवी तारीख घरांचा ताबा देण्यासाठी दिली असून अजूनही महागृहनिर्माण प्रकल्पासमोर मलनिसारण वाहिनी, जलवाहिनी आणि रस्त्यांचे काम सूरु आहे. घरांचा ताबा मिळण्यासाठी अजूनही 43 दिवस शिल्लक असल्याने ही कामे तातडीने करावीत आणि नूकसान भरपाई सिडकोने द्यावी अशी मागणी सदनिकाधारकांकडून होत आहे.