कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल

पनवेल : रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पायी चालणाऱ्या प्रवाशांची वाट तीन आसनी रिक्षाचालकांनी अडवली आहे. सध्या तीन आसनी रिक्षांना स्थानक परिसरात काम सुरू असल्याने प्रवेशबंदी केल्याने काही रिक्षाचालकांनी पादचाऱ्यांची वाट अडवून पोलिसांच्या कारवाईला ठेंगा दाखविला आहे. वाहतूक पोलिसांना याबाबत विचारल्यावर त्यांनी बेशिस्त चालकांवर कारवाई सुरू असल्याची माहिती दिली.

पनवेल स्थानक परिसरात बहुउद्देशीय मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे काम असल्याने स्थानकात रेल्वे पकडण्यासाठी वृद्ध, बालक व अपंगांना स्थानक गाठण्यासाठी दिव्य पार करावे लागते. सुमारे काही मीटर अंतर हातामध्ये ओझे घेऊन चालणाऱ्या प्रवाशांना स्थानकाकडे जाणाऱ्या वाटेत रिक्षांना वळसा घालून जावे लागते. काही रिक्षाचालक त्यांची वाहने बेकायदा पद्धतीने स्थानकापर्यंत घालतात. सामान्य प्रवासी मात्र वाट काढत स्थानकापर्यंत जातो.

दीड महिन्यापूर्वी रिक्षाचालकांच्या दोन गटांतील हाणामारीमुळे पनवेल रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या विस्तारीकरणाचे काम पुढे करत रिक्षांना स्थानक परिसरातील स्टॅण्डपर्यंत येण्यास बंदी केली. मात्र रिक्षांना प्रवेश नाही तर सर्वसामान्यांच्या वाहनांना स्थानक परिसरातील रस्ता बंद करण्याची वेळ आली. बेशिस्त पार्किंग व्यवस्था, रेल्वे प्रशासनाचा अनियोजित कारभार आणि रेल्वे तसेच वाहतूक पोलिसांची सातत्याची कारवाई नसल्याने या असमन्वयाच्या कारभारात सामान्य प्रवासी भरडले जात आहेत. सामान्यांची वाट अडवणाऱ्या या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करतील का, हा प्रश्न आहे.

विशेष म्हणजे स्थानक परिसरात व्यवसाय करणारे रिक्षाचालक प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. रात्रीच्या वेळेस बोलीभाडे पद्धतीने अवाजवी भाडे आकारले जातात. रिक्षाचालक नियमाप्रमाणे व्यवसाय करत नाहीत, याला पनवेलचा प्रादेशिक परिवहन विभागसुद्धा जबाबदार आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने वेळीच लक्ष न घातल्याने ही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

स्थानक परिसरात विस्तारीकरणाचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतल. मात्र एसटी बस पकडण्यासाठी प्रवाशांना दीडशे पावले चालावे लागते. रिक्षा पकडण्यासाठी शंभर पावले चालावे लागते. अपंग व वृद्धांसाठी रेल्वे प्रशासनाने कोणतीही सुविधा ठेवली नाही.

पनवेलमधील रिक्षाचालकांनी शिस्त पाळून व्यवसाय करावा यासाठी वेळोवेळी रिक्षाचालकांचे प्रबोधन केले आहे. वेळीच त्यांच्यावर कारवाई केली आहे. पोलिसांची कारवाई या परिसरात सातत्याने सुरू असते. रात्रीच्या व पहाटेच्या वेळी रिक्षाचालक रस्ता अडवून रिक्षा उभी करत असल्यास पोलीस कर्मचारी बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई नक्की करतील. -संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल वाहतूक विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *