विशेष
श्याम ठाणेदार
आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगचे हे सतरावे वर्ष आहे. सलग सतरा वर्ष आपली लोकप्रियता टिकवून ठेवणारी आयपीएल ही जगातील एकमेव क्रिकेट लीग आहे. गेली सतरा वर्ष केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून आयपीएलकडे पाहिले जाते. जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू या लीगमध्ये सहभागी होतात. मुळातच क्रिकेटला एका धर्माप्रमाणे स्थान असलेल्या भारतामध्ये आयपीएल सुरू असल्याने सहभागी संघाचे फॅन फॉलोअर्सची संख्या देखील खूप मोठी आहे. आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करण्यासाठी फॅन मैदानावर गर्दी करताना दिसतात. आयपीएलचा सामना कोणत्याही मैदानावर, कोणत्याही शहरांमध्ये असो क्रिकेट रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे मैदाने तुडुंब भरली असल्याचे चित्र आपण दरवर्षीच पाहतो मात्र यावर्षी मैदानासोबतच मैदानाबाहेरही आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करण्यासाठी चाहत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. आजचे युग सोशल मीडियाचे युग आहे सोशल मीडियाचा वापर न करणारा क्रिकेट चाहता शोधूनही सापडणार नाही. आयपीएलमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे दहाच्या दहा संघाचे स्वतंत्र ट्विटर अकाउंट आहेत. प्रत्येक संघाला ट्विटरवर फॉलो करणारे लाखो फॉलोअर्स आहेत. हे फॉलोअर्स ट्विटर वरून आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करत असतात. आयपीएलची मॅच चालू असताना ट्विट्सचा अक्षरशः पाऊस पडतो. सेकंदाला हजारो ट्विट्स येत असतात. जे ते आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ट्विट करत असतात. या सर्वांमध्ये मुंबई इंडियन्सचे फॅन फॉलोअर्स सर्वात जास्त आहेत. ट्विटर प्रमाणेच व्हाट्सएप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर देखील चाहते आपल्या संघाला सपोर्ट करीत असतात. आपल्या आवडत्या संघाची मॅच असेल तर चाहते आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी व्हाट्सएपवर स्टेटस ठेवतात. सध्या सोशल मीडियाचं चित्र पाहिलं तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग व आरसीबी या तीन संघांना सोशल मीडियावर चाहत्यांचा सर्वात जास्त सपोर्ट मिळताना दिसत आहे. खेळाडूंमध्ये सर्वात जास्त सपोर्ट चेन्नई सुपर किंगचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी महेंद्रसिंग धोनीची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही उलट वाढतच चालली आहे हे सोशल मीडियावरुन लक्षात येते. मुंबई इंडियन्स संघासोबत चेन्नईच्या सामन्यात धोनीचा खेळ सव्वादोन कोटी लोकांनी जिओ टीव्ही वर ऑनलाइन पाहिला. जिओ टीव्ही वर सर्वात जास्त व्हीव त्या सामन्याला मिळाले हा एक विश्वविक्रमच आहे. फेसबुक, व्हाट्सएपवर मॅच कोण जिंकणार याबद्दल चाहत्यांमध्ये पैजा लागत आहे. मॅच संपल्यानंतर मॅचवर आधारित तसेच प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या खिल्ली उडवणाऱ्या मजेशीर मिम्स बनवून व्हायरल केल्या जात आहे. हे मिम्स बोलके असतात. यातून करमणूक तर होतेच पण संघाची सद्यस्थिती काय आहे हे देखील समजते. आपल्या संघाने चांगली कामगिरी केली किंवा संघ विजयी झाला तर संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक आनंदी असतात मात्र कोलकोता नाईट रायडर्स संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर हा संघाने चांगली कामगिरी केली किंवा संघ जिंकला तरी अतिशय गंभीर असतो त्यावर गौतम गंभीरची खिल्ली उडवणारे अनेक मिम्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मुंबईचा संघ सध्या पराभवाच्या गर्तेत सापडला आहे. सलग तीन सामन्यात पराभव झाल्याने मुंबई संघ नेटिझन्सच्या निशाण्यावर आला असून या संघाची सोशल मीडियावर चांगलीच खेचली जात आहे. मुंबई संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या हा तर नेटिझन्सचा हॉट फेवरेट बकरा बनला आहे. कर्णधार झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात त्याने रोहित शर्माला बोंड्रीवर फिल्डिंग करायला पाठवल्याने क्रिकेट प्रेमी त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत. हार्दिक पांड्याच्या या कृतीमुळे प्रेक्षकांनी मैदानात तर त्याची खिल्ली उडवलीच पण मैदानाबाहेर ही त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले. हार्दिक पांड्याला ट्रोल करणाऱ्या मिम्सचा सोशल मीडियावर अक्षरशः पाऊस पडत आहे. नेटीझन्स सोशल मीडियावर मजेशीर मिम्स, मेसेज करत आपल्या संघाला सपोर्ट करतानाच प्रतिस्पर्धी संघाची खिल्ली उडवून फॅन आयपीएलचा फिव्हर आणखी वाढवत आहेत. एकूणच केवळ मैदानावरच नव्हे सोशल मीडियावर देखील आयपीएलचा फिव्हर वाढल्याचे दिसत आहे.