गांधीनगर- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत, आम्ही आरक्षणाला कुणालाही हात लावू देणार नाही. बहुमताचा दुरुपयोग करण्याची परंपरा काँग्रेसचीच आहे. आणीबाणी लादण्यासाठी आणि लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी इंदिरा गांधींनी बहुमताचा गैरवापर केला होता, असा घणाघात अमित शहा यांनी केला.

 भाजपवर राज्यघटना बदलल्याचा आरोप काँग्रेस वारंवार करत आहे. त्यावर अमित शाह म्हणाले की, भाजप हे कधीही करणार नाही आणि कोणालाही करू देणार नाही. विरोधक संविधान बदलण्याचा मुद्दा आरक्षणाशी जोडून मांडत आहेत. पण मला हे स्पष्ट करायचे आहे की, 2014 आणि 2019 मध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. नरेंद्र मोदी गेल्या 10 वर्षांपासून पूर्ण बहुमताने राज्य करत आहेत. आम्ही कधीच संविधान बदलण्याचा विचार केला नाही.

आम्ही आरक्षणाशी कधीही छेडछाड करणार नाही आणि आम्ही कोणालाही तसे करू देणार नाही. ही आमची देशातील जनतेशी बांधिलकी आहे. नरेंद्र मोदींनी मागास समाज, दलित समाज आणि आदिवासींच्या कल्याणाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. आम्ही आमच्या बहुमताचा वापर कलम 370 काढून टाकण्यासाठी, तिहेरी तलाक रद्द करून मुस्लीम महिलांना न्याय देण्यासाठी आणि सीएए द्वारे पीडित लोकांना न्याय देण्यासाठी केला.

काँग्रेसवर हल्लाबोल करताना अमित शाह म्हणाले की, बहुमताचा गैरवापर करण्याची परंपरा काँग्रेसचीच आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादण्यासाठी आणि लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी बहुमताचा गैरवापर केला. देशातील महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे विरोधकांनी असे आरोप केले तरी, देशातील जनता फसणार नाही.

ईव्हीएम छेडछाड आणि इलेक्टोरल बाँड्सचा मुद्दाही विरोधक आजकाल मोठ्या प्रमाणात उचलत आहेत. यावर अमित शहा म्हणाले, त्यांच्या पक्षानेही इलेक्टोरल बाँड्स घेतले आहेत, त्यामुळे ही खंडणीच नाही का? ते ज्या ज्या राज्यांमध्ये सत्तेत होते, त्यांनीही इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून पैसे घेतले आहेत. काँग्रेसला 9,000 कोटी रुपये मिळाले, तर भाजपला 6,600 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळेच विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत, असेही अमित शाह यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *