मिलिंद देवरांचा आरोप
मुंबई: काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या दलित असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर दबाव आणून त्यांची तिकीट कापली, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी केला. दक्षिण मध्य मुंबई हा खुल्या प्रवर्गातील मतदारसंघ आहे. त्यामुळे येथून वर्षा गायकवाडांच्या रुपाने दलित चेहरा दिल्यास नुकसान होऊ शकते, असे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना सांगितल्याचा दावा देवरा यांनी केला. मिलिंद देवरा यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.
या ट्विटमध्ये देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उबाठा गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते. उबाठा गट महाराष्ट्रात २१ जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र त्यात केवळ एका जागेवर उबाठा गटाने दलित उमेदवाराला संधी दिली आहे. आम्ही या निवडणुकीत तीन दलित उमेदवारांना संधी दिली आहे. महाविकास आघाडीत दलित उमेदवारांची प्रतारणा सुरु आहे. कारण काँग्रेस आणि उबाठामध्ये दलित समाजबांधवांना स्थान आणि मान नाही आणि खुल्या मतदारसंघातून दलित उमेदवार उभा करण्याची त्यांच्यात हिंमत नाही, असे मिलिंद देवरा यांनी म्हटले. उबाठा गटाला दलित समाजाची मतं हवीत, पण नेतृत्त्व नको असेही मिलिंद देवरा यावेळी म्हणाले.