उल्हासनगर ः उल्हासनगरातील काही भागांत दूषित पाण्याचा पुरवठा होत असून हे गढूळ पाणी बॉटल्समध्ये भरून नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयात धाव घेत तक्रार दिली.
सुभाष टेकडी परिसरातील अनेक भागांत पाणी सोडण्याची वेळ निश्चित नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. काही दिवसांपूर्वीच ड्रेनेजचे खोदकाम करताना पाण्याची लाईन तुटल्याने आठवडाभर नागरिकांचा घसा कोरडा राहिला होता. नागरिकांनी आंदोलन केल्यावर लाईन दुरुस्त केली होती. आता गेल्या तीन दिवसांपासून दहा चाळ नालंदा शाळेजवळील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा केला जातो आहे. या पाण्याला दुर्गंधीही येत आहे. नागरिक ॲड. प्रशांत चंदनशिव यांनी नागरिकांसोबत दूषित पाणी बॉटल्समध्ये भरून महापालिकेत उपअभियंता आर. एन. ठाकरे यांना दाखवले. ते कनिष्ठ अभियंता हरेश मिरकुटे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. यावर तत्काळ उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.