चिपळूण : तालुक्यातील कळवंडे धरणाची दुरुस्ती होत नसल्याने शेती उद्ध्वस्त झाली असून, कळवंडे पंचक्रोशीतील १० हजार लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा अधिकारी, तहसीलदार व ग्रामस्थांची कळवंडेत गुरूवारी संयुक्त बैठक झाली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्याने चार गावांतील ग्रामस्थ निवडणुकीवरील बहिष्कारावर ठाम आहेत.
कळवंडे येथील श्रीदत्त मंदिरात कळवंडे, पाचाड, कोंढे व रेहेळभागाडी ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीला अधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळे ग्रामस्थांचा पारा चढला होता. गुरूवारी दुपारी झालेल्या बैठकीला रत्नागिरीचे जलसंपदा विभागाचे जिल्हा अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, उपअभियंता विपुल खोत, तहसीलदार प्रवीण लोकरे, कळवंडेतील उद्योजक वसंत उदेग यांच्यासह पाचाड, रेहेळभागाडी, कोंढे आणि कळवंडे येथील शेतकरी उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीलाच शेतकऱ्यांनी धरण दुरुस्तीवरून संताप व्यक्त केला.