नवी मुंबई : अवघा महाराष्ट्र उन्हाच्या गरमीने होरपळत असताना आज घणसोलीकरांना दुहेरी मार सहन करावा लागला. सुर्य आग ओकत असतानाच घणसोलीत तब्बल १८ तास बत्तीगुल होती. विजवितरणाच्या या ब्लॅकआऊटमुळे नागरीक हैराण झालेत. बुधवारी रात्री ११ वाजता वीजपुरवठा खंडित झाला तो गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सुरु करण्यात आला.

धक्कादायक म्हणजे घणसोली गावात तीन दिवसांपूर्वीच तब्बल २० तास वीजपुरवठा खंडित झाला होता. विजेची मागणी वाढल्याने केबल स्फोट झाल्याचे कारण सांगण्यात आले आहे.

तीन दिवासांपूर्वी घणसोली गावातील बहुतांश ठिकाणी २० तास तर दोन दिवसांपूर्वी ऐरोली येथे १० तास वीज खंडित झाली होती. तर बुधवारी रात्री ११च्या सुमारास पुन्हा घणसोली गावातील शिवाजी तलाव परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता. तर काही ठिकाणी सकाळी पाच वाजता वीज पुरवठा खंडित झाला होता. हा वीज पुरवठा गुरुवारी साडे पाचच्या सुमारास सुरळीत झाला. अशी माहिती अंजली देशमुख या रहिवासी महिलेने दिली. महावितरणाचा ओंगळ कारभाराचे दर्शन गेले काही दिवसात सातत्याने होत असून याचा सर्वाधिक फटका घणसोली आणि ऐरोली भागाला बसत आहे.

घणसोली गावातील वीज वाहिन्या या सिडकोकालीन जुनाट, कमकुवत झालेल्या आहेत. २५ ते ३५ वर्षे जुन्या वीजवाहिन्या त्यात अनेकदा रस्ते खोदणे, सिमेंट काँक्रीटीकरण, डांबरीकरण होत असल्याने केबल्सची अवस्था आणखी खराब होते. त्यामुळे या केबल्सच जादा विजेचा भार सहन करू शकत नाहीत आणि ठिकठिकाणी छोटे छोटे स्फोट होऊन केबल जळते. अशा ठिकाणची अनेक वर्षांपासून तात्पुरती दुरुस्ती होत असल्याने आता केबल्स जादाचा वीज भार सहन करू शकत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *