विशेष
डॉ. सोमनाथ कोमरपंत
माझे निकटचे स्नेही डी.बी. जगत्पुरिया आता 75 वर्षांचे झाले. पण त्यांच्याकडे पाहताना कोण विश्वास ठेवील या गोष्टीवर? कुणी असंही म्हणण्याची शक्यता आहे : मराठी साहित्यविश्वातील आणि विचारक्षेत्रात कुणीतरी ही लोणकढी थाप मारलेली आहे. पण जगत्पुरियांच्या आजवरच्या जीवनाच्या खडतर साधनेतून निर्माण झालेले सुमधुर नवनीत अनुभवताना त्यांच्या कृतकृत्य झालेल्या सुफलित जीवनप्रवासावर आपण त्यांच्या पाठीवर प्रेमाने अन कौतुकानं थाप मारू या. म्हणजे लोणकढयाचं सत्यात रुपांतर होईल. अशा प्रकारचा सर्वमान्य अमृतमहोत्सवी योग किती जणांच्या वाट्याला सुखासुखी प्राप्त होतो ?
सर्वप्रथम भौगोलिकदृष्ट्या दूरस्थ असलेल्या पण पुन: पुन्हा मनात निर्माण होणार्या भावसंदर्भाच्या हिशोबाने अंतःस्थ असलेल्या माझ्या प्रिय मित्राचे मी त्याच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे अंतःकरणपूर्वक अभीष्टचिंतन करतो. पण तेवढ्यावर थांबणार नाही. आजवरच्या त्यांच्या व्यक्तित्त्वाचा लखलखील कर्तृत्वाचा तेजस्वी, प्रसन्न आलोक न्याहाळतच पुढच्या त्यांच्या जीवनक्षितीजावर नवे प्रकाशकिरण दिसत असतांना अंतःस्फूर्त बांग देतो. आता तांबडं फुटणारच याची पूर्ण खात्री असल्यामुळे त्यांच्याकडून माझ्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. अशी अतिशयोक्त आणि वरपांगी शब्दांची उधळण आज मला करावी लागणारच नाही.
या लेखातून आपल्याला एका समाजमनस्क, प्रतिभासंपन्न, अभिरूचिसंपन्न, चिंतनशील वृत्तीच्या सृजनशील व्याक्तिमत्त्वाची संक्षेपाने ओळख करून घ्यायची आहे. तसा हा माणूस सहजासहजी आपल्या कवेत घेता येण्यासारखा नाही. अभावग्रस्त अशा गरीब शेतकरी कुटुंबात जगत्पुरिया यांचा औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वरठाण या गावी झाला. डी.बी. जगत्पुरिया यांनी साहित्यक्षेत्रात शून्यातून अभिनव सृष्टी निर्माण केली. प्रामुख्याने ते कवी म्हणूनच साहित्य जगतात अधिक ओळखले जातात.
डी. बी.जगत्पुरिया यांचे आजमितीस ‘ठिणगी’, ‘वज्रमूठ’, ‘सूर्यकुल’, ‘दरबार’ आणि ‘रणांगण’ हे पाच कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्या व्यक्तिमत्त्वातील शोषित वर्गाविषयीची अपार कणव, अन्यायाच्या प्रतिकारार्थ युयूत्सूवृत्तीने लढवय्या होऊन संघर्ष करणार्या वाणीची वीण, रक्तशोषण करणार्या अमानुष शक्तींविषयीची विलक्षण चीड, काळजाच्या कमळावर कोरलेली आत्मतत्त्वाची समर्थ अभिव्यक्ती, विज्ञानयुगाचे अगत्यपूर्वक स्वागत करणारी सत्त्वशीलतेचा ध्यास बाळगून नव्या स्वरांची उभारी घेऊन; समृद्ध भारत उभा करण्याची जिद्द त्यांच्या या काव्यसंपदेतून आजच्या काळाभोवती योग्य ती बूज राखून व्यक्त झाली आहे. कविता हा मानवी जीवनाचा सारांश समर्पक शब्दकळेतून व्यक्त होणारा सशक्त वाङ्मयप्रकार आहे. यावर या कवीचा विश्वास असावा. आजवर आसासून आणि पोट-तिडिकेतून प्रकट झालेल्या त्यांच्या या आत्मस्वराने हेच दाखवून दिलेले आहे. हे जरी खरे असले तरी वाङ्मयीन अभिव्यक्तीसाठी अन्य प्रकार जगत्पुरियांनी वर्ज्य मानलेले नाहीत.
जीवनप्रवासात त्यांना भेटलेल्या, प्रभावित केलेल्या आणि त्यांच्यावर कळत वा नकळत संस्कार केलेल्या व्यक्तींची चित्रे त्यांनी तन्मयतेने रेखाटली आहेत. ही चित्रे आणि त्यांची चरित्रे या लेखकाला प्रेरणादायी वाटतात. या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची संस्मरणे त्याला मनाच्या गाभार्यात जोजवावाशी वाटतात. ज्ञानमार्गी माणसाला उजेड प्रिय असतो. तोच त्याचा जीवनाचा धावा, त्राता असतो. जीवनप्रेरक क्षणांचे पाथेय हा उजेडच देत असतो. त्यामुळे अंधारातील, खडकाळीतील वाट सुसह्य होत असते. या दृष्टीने जगत्पुरियांचे ‘उजेडाचे वारसदार’ आणि ‘उजेडाचे वाटसरू’ हे व्यक्तीचित्रांचे संग्रह अभ्यासनीय वाटतात.
जगत्पुरियांच्या कवितेतून मावलेला शब्दस्फोट त्यांनी जीवनभाष्यस्वरुप असलेल्या त्यांच्या सामाजिक चिंतनपर आणि वैचारिक ग्रंथांमधून व्यक्त झालेला आहे. त्यांच्या या वैचारिक परिक्रमेचे परिणत रूप त्यांच्या ‘झुंबर’ आणि ’डंका’ या ग्रंथांमधून पहायला मिळते. सृजन आणि समीक्षा वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचे दोन महत्त्वाचे पैलू होत. सृजनात्मक ऊर्मी निरंतर जोपासणार्या या लेखकाने लेखन प्रक्रियेकडे एक व्रत म्हणून पाहिले. त्याने समीक्षेची पाऊलवाटही तेवढ्याच निष्ठेने जोपासली. ‘मूल्याक्ष : कवितेची सम्यक समीक्षा’, ‘माझ्या कवितेची समीक्षा’, ‘सत्त्वसार’, ‘दस्त-ऐवज’ आणि ‘सृजन-पर्व’ हे त्यांनी लिहिलेले उपयोजित समीक्षेचे महत्त्वपूर्ण ग्रंथ त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांची समीक्षादृष्टी किती चोख आहे याचा त्यांमधून प्रत्यय येतो. संघर्ष हा जगत्पुरियांच्या जीवनाचा प्राणहेतू असल्याचा प्रत्यय अनेक बाबींमधून येत राहतो. तुकाराम महाराजांच्या सुविख्यात अभंगातील ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग ।’ या वचनाचे प्रत्यंतर येथे येते. प्रख्यात पाश्चात्त्य विचारवंत रोमा रोलां यांचा विचारही तुकारामांच्या अभंगाशी आधुनिक काळखंडात कोन साधणारा आहे. तो उद्गार असा:
‘‘साहित्यिक हे जीवनसंगरातील सर्वश्रेष्ठ सैनिक होत.’’
या कविमनाच्या साहित्यकाने सामाजिक संवेदनशीलतेच्या दलित कवितांचा अनुवादित संग्रह ‘योद्धा’ याच नावाने संपादित केलेला आहे. त्याच्या निवासस्थानाचे नावही ‘संगर’ आहे. हे सारे आपाततः घडलेले नाही. त्यामागे खंबीर योजना आहे.
आम्ही वैकुंठवासी । आलों याचि कारणासि । बोलिले जे ऋषी । साच भावें
वर्ताया ॥ झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग। उच्छिष्टाचा भाग ।
शेष उरलें तें सेवूं ॥ अर्थे लोपलीं पुराणें । नाश केला शब्दज्ञानें । विषयलोभी
मन । साधनें बुडविलीं ॥
या तुकाराम महाराजांच्या समर्थवाणीचा बुद्ध्याच झालेला कविमनावर हा दृढ संस्कार आहे. जगत्पुरियांच्या संपूर्ण कवितेत हे मनोबलदर्शन ओतप्रोत भरून राहिलेले आहे. पण त्याचबरोबर नितांत करुणाभावानेही त्यांची कविता ओथंबलेली आहे. जगत्पुरियांच्या समीक्षादृष्टीतही अंगार आणि अश्रू यांची गळामिठी पडलेली आहे. ‘उमंग’, ‘चिनगारी’ आणि ‘ऐलान’ हे जगत्पुरियांचे हिंदी कवितासंग्रह ही त्यांची कवितारती प्रशंसनीय स्वरूपाची आहे.
‘सत्त्वसार’ या जगत्पुरियांच्या महत्त्वपूर्ण समीक्षाग्रंथात काव्यसमीक्षा गद्य साहित्यसमीक्षा आणि आत्मकथनसमीक्षा अशी तीन गटांत त्यांचे समीक्षालेखांची विभागणी झालेली आहे. मनस्विता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायी भाव आहे. त्यांच्या काव्यसमीक्षेतील भावसंदर्भ लक्षात घेता मानवी दुःखाला आणि करुणेला कवेत घेणार्या कवितेत स्थान दिले गेलेले आहे. मानवी जीवनातील मृत्यविवेकालाही येथे प्राधान्य दिले गेलेले आहे. शोषणप्रक्रियेवर प्रहार करणार्या कवितेला येथे स्थान मिळालेले आहे. सर्वंकष विषमतेला निक्षून विरोध करणारे कविमन येथे दिसते. हे मन मातीचे सत्त्व जागविणार्यांना कवेत घेते. क्रांतिप्रवणता हा युगमानसाचा प्राणस्वर असल्यामुळे हा सहृदय साहित्यिक आणि समीक्षक तिचे उदारमनस्क वृत्तीने स्वागत करतो. माती आणि माणूस यांमधील आंतरिक अनुबंध अधोरेखित करतो. तंत्रज्ञानातील संगणकीय युगाचे त्याला भान आहे. माणुसकीची दुबार पेरणी व्हावी ही त्यांची अंत:प्रेरणा आहे. आदिमतेचा आणि निसर्गसौंदर्याचा ध्यास हे देखील या कवी/ साहित्यिकाचे जीवितध्येय आहे. माणुसकीची कळ जोपासणारी त्यांची जीवनदृष्टी मला अत्यंत भावते. विलोभनीय वाटते.
सृजनशील साहित्य निर्मितीत सतत मग्न असणारा जगत्पुरिया हा समकालीन साहित्यविश्वातील महत्त्वाचा आणि सव्यसाची लेखक आहे. ‘कळली किमया त्रिकोणाची’, ‘बलिदान’ आणि ‘हे खेळ भावनांचे’ हे त्यांचे एकांकिकासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. ‘चुडेदान’ हे तीन अंकी सामाजिक नाटक त्यांनी लिहिले आहे.
हे सारे विवेचन केले आहे ते त्यांच्या सृजनशील साहित्यनिर्मितीच्या आणि समीक्षालेखनाच्या संदर्भात. त्यांच्या जगत्पुरिया या आडनावात त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्त्वाचे सारसर्वस्व सामावलेले आहे असे मला वाटते. जगताला पुरून उरलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे जगत्पुरिया तर नव्हे ना?
सृजनप्रक्रियेबरोबर सृजन विकास आणि वाङ्मयप्रसार हे जगत्पुरिया यांनी आपले जीवितध्येय मानलेले आहे. साहित्याचा प्रसार समाजात होत राहिल्याने सत्प्रवृत्तींचे पोषण होते अशी त्यांची नितांत श्रद्धा आहे. साहित्य साधना ही समाजधारणेची दृढ कोनशिला आहे. तिच्यावर संस्कृतीचा सारा डोलारा उभा राहतो. भारतासारख्या समृद्ध ज्ञानपरंपरा असलेल्या राष्ट्रात पूर्वसुरींनी आजवर हाच विधायकतेचा मानदंड निर्माण केलेला आहे. जगत्पुरियांनी आजवर हाच आदर्श जोपासलेला आहे. आजवर साठ लेखक-कवींच्या पुस्तकांना अभ्यासपूर्ण आणि विवेचक प्रस्तावना लिहून त्यांनी उदारमनस्क वृत्ती प्रकट केली नाही काय? त्यांनी केलेली ही पाठराखण प्रशंसनीय स्वरुपाची. त्यांनी समाजाला भरभरून दिले. समाजमानसाने त्याची परतफेड त्याच खुल्या मनाने केली. त्यांना आजवर मिळालेले पुरस्कार, सन्मानाचे अन गौरवाचे क्षण हेच दाखवून देतात.
त्यांनी ‘जनशक्ती’, ‘आपला महाराष्ट्र’, ‘गावकरी’, ‘मतदार’, ‘देशदूत’ आणि ‘श्रमराज्य’ या नियतकालिकांमधून सदरलेखन केले आहे. परमेश्वर त्यांना निरामय आणि उदंड आयुष्य देवो. त्यांच्या अमृतमहोत्सव प्रसंगी त्यांचा एक चाहता आणि स्नेही या नात्याने मी त्यांचे मन:पूर्वक अभीष्टचिंतन करतो.