वर्धा – काँग्रेस आणि इंडी आघाडी नेहमीच विकासविरोधी आणि शेतकरी विरोधी राहिली आहे. त्यामुळेच, देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. काँग्रेसचे आजवरचे काम म्हणजे, “ बारशाला गेला आणि बाराव्याला आला” अशा थाटाचे होते अशी बोचरी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. काँग्रेसच्या काळातील दप्तरदिंगाईवर मोदी यांनी सडकून टिका करताना मराठी म्हणींचा यथेच्छ वापर केला. यापूर्वी नागपूरच्या पहिल्या सभेतही मोदींनी मराठी म्हणीचा उल्लेख केला होता. त्यावेळी, पाण्यावर काठी मारल्यानंतर पाणी दुभंगत नाही, असे मोदींनी म्हटले होते. आता, पुन्हा एकदा मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्लाबोल केला.
दरम्यान, यावेळी, राज्यातील महायुती सरकार महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विविध योजनांसाठी काम करत आहे. सिंचन योजना, दळणवळण यांसह अनेक क्षेत्रात महाराष्ट्रात मोठं काम होत असल्याचंही मोदींनी म्हटलं.
वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मोदींची वर्ध्यात सभा होत असून नेहमीप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रातील भूमीतून मराठीत भाषणाला सुरुवात केली.भाषणाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या आणि विदर्भातील संतांचे गुणगान गायले. चैत्र एकादशीनिमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाला वंदन करतो, असे मोदींनी म्हटे. आपलं प्रेम आणि आशीर्वाद मोठ्या प्रमाणात आहेत. या सभेसाठी लोकांचा उत्साह आणि गर्दी पाहून मी भारावल्याचे मोदींनी म्हटले.
आपल्या देशात २०१४ पूर्वी नैराश्याचे वातावरण होते. वीज, पाणी, रस्त्यांच्या अनेक गावात समस्या होत्या. मात्र, गेल्या 10 वर्षात आपल्या सरकारने २५ कोटी भारतीयांना गरिबातून बाहेर काढले. देशात ५० कोटींहून अधिक बँक खाते नव्याने उघडले आहेत. आता, विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं स्वप्न दूर नाही,असे मोदींनी म्हटले. मी जी गॅरंटी देतो, त्यासाठी दिवसरात्र खपायला मी तयार आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे की, पुढील 5 वर्षात ३ कोटी घरं बनवणार. नळाद्वारे प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचणार आहे. आपल्या कुटुंबातील वृद्ध, आई-वडिल यांच्यावरील उपचार खर्चासाठी 5 लाख रुपयांपर्यतचा खर्च शासन करणार आहे. तसेच, ज्याप्रमाणे नळातून पाणी येते, तशाच रितीने पाईपमधून गॅस येणार आहे. देशातील प्रत्येक कोपऱ्यात वंदे भारतप्रमाणे रेल्वे धावतील. भारताने चंद्रयान पाहिले, आता गगनयानही पाहणार आहे, असे आश्वासन मोदींनी दिले.