कोकण भवनात आढावा
नवी मुंबई : 1 मे, महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने पूर्व तयारीची बैठक कोकण विभागाच्या महसूल शाखेचे उपायुक्त विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता लागू असलेल्या आचारसंहितेमुळे यंदा महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण साध्यापध्दतीने होणार असल्याची माहिती उपायुक्त विवेक गायकवाड यांनी दिली.
कोकण भवनातील पहिला मजला समिती सभागृह येथे झालेल्या या बैठकीत उपआयुक्त सामान्य अमोल यादव, उपआयुक्त विकास गिरीष भालेराव, तसेच कोकण विभागातील विविध कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
वातावरणातील बदल आणि वाढते तापमान लक्षात घेता यंदा महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय स्तरावरील मुख्य ध्वजारोहण दि. 1 मे, 2024 रोजी सकाळी 8.00 वाजता करण्यात यावे असे शासनाचे निर्देश आहेत. मुख्य शासकीय ध्वजारोहण कळंबोली सेक्टर-17 येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार असून. त्या अनुषंगाने बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. गायकवाड यांनी कोकण भवनातील सर्व शासकीय यंत्रणांनी हा सोहळा लोकसभा निवडणूकीमुळे लावण्यात आलेल्या आचारसंहितेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन यशस्वीरित्या व उत्साहात साजरा करण्याबाबत सूचना दिल्या. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी आणि हा कार्यक्रम उत्साहात साजरा करावा, असे सांगून सर्वांनी शासकीय पोशाखात कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे ही त्यांनी यावेळी सांगितले.