प्रकाश शेळके
जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक
सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये लहान मुले टीव्ही व मोबाइलचा अतिवापर करताना दिसतात. शाळेतून घरी आल्यावर हा स्क्रीन टाइम मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. सुट्टी असेल तर मग बघायलाच नको. सर्व वयोगटातील मुले मग रात्रंदिवस मोबाइल फोन आणि टीव्हीला चिकटलेली असतात. या समस्येवर मात करण्यासाठी मुलांचा कोणत्या ना कोणत्या तरी खेळामध्ये नियमित सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवून त्यांचा समतोल विकास करायचा असेल तर त्यांच्या सवयी बदलायला लागतील. रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे, समतोल आहार घेणे यामुळे मुलांच्या शारीरिक विकासासोबत बौद्धिक, मानसिक, सामाजिक विकास होतो. मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. शहरी भागात मुलांना घरी खेळण्याकरिता पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे ती फावल्या वेळेत मोबाइलवर गेम्स खेळतात. टीव्ही बघतात. त्यामुळे मुलांचे शारीरिक व मानसिक संतुलन बिघडते. त्यांचा अस्वस्थपणा वाढतो. हे आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे डोळ्यावरही दुष्परिणाम होतात. मुलांमध्ये खेळाची, व्यायामाची गोडी निर्माण करायला हवी. पालकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी मुलांना पालकांनी वेळ द्यायला हवा.