जळगाव : लोकांना आता मोदींची हुकमशाही नकोय तर लोकशाही पाहिजे. मोदींची हुकूमशाही राजवट या लोकसभा निवडणूकीत उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यात ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, मी कृषी मंत्री झालो तेव्हा केवळ एक महिन्याचे धान्य शिल्लक होते. मी अस्वस्थ झालो. आमच्या लोकांना खायला नाही. आज देशाचे चित्र बदललेले आहे. जो देश धान्य निर्यात करत होता आता तोच देश आयात करत आहे.
भाव वाढल्याने सामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले आणि ते विचारता तुम्ही काय केले? आज देशात वेगळा विचार करण्याची गरज आहेत. कधी राहुल गांधींवर टीका करतात. त्यांनी देशाच्या सगळ्या भागात जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेतले. त्यांच्यावर टिंगल केली जात आहे. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर पक्षाची जबाबदारी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. अगोदर तुम्ही काय केले ते सांगा मग इतरांवर टीका करा.
काँग्रेसचा विचार ग्रामीण भागात फैजपूर अधिवेशनापासून दिला गेला. अनेक नेते होऊन गेले, त्यांनी राज्याचा आणि देशाचा विचार केला. आता मोदींचे काळात काय आहे? अनेक लोकांना नोकरी नाही. आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. केळीचे पीक नष्ट झाले, मात्र शासकीय यंत्रणेचा उपयोग हुकूमशाहीसारखा केला जात आहे. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले जात आहे याचा अर्थ ही हुकूमशाही आहे.असेही शरद पवार म्हणाले.
