शिवमंदिराच्या भिंतीला लागूनच अनधिकृत बांधकाम
उल्हासनगर : उल्हासनगर आणि अंबरनाथच्या सीमेवर असलेल्या प्राचीन शिव मंदिराच्या भिंतीला लागूनच अनधिकृत रित्या आरसीसी बांधकाम केले जात आहे. विशेष म्हणजे अंबरनाथ नगरपरिषद मूग गळून गप्प बसल्याने खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे शिव मंदिर परिसराचा विकास करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे का अशी चर्चा शहरात रंगली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयोध्याचे महंत गोविंद गिरी महाराज, पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते १५० कोटीच्या विकास कामाचे भूमिपूजन आर्ट फेस्टिव्हलच्या वेळी करण्यात आले. ९६५ वर्ष अति प्राचीन असलेल्या शिवमंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी राज्य शासनामार्फत १५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे, आणि या दीडशे कोटींच्या माध्यमातून शिवमंदिर परिसरात विविध विकास कामे होणार आहेत.
ज्याप्रमाणे भाविक काशीला जातात महाकालला जातात. त्याचप्रमाणे अंबरनाथ शिव मंदिराचा कॉरिडोर ज्या वेळेस पूर्ण होईल त्यावेळेस फक्त अंबरनाथ मधील नाही तर देशा विदेशातील लोक या अंबरनाथ शिव मंदिराला भेट देण्यासाठी येतील असे खासदार डॉ श्रीकांत शिंदे म्हणाले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असलेल्या नगर विकास मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेतील मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ मात्र त्यांचे हे स्वप्न पूर्ण हो इच्छित नाहीत.
प्राचीन शिव मंदिराच्या भिंतीला लागूनच आरसीसी बांधकाम जोमाने सुरू आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम दिसू नये म्हणून काळा कपडा लावून लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हे बांधकाम इतरांच्या नजरेने लपत असले तरी अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अनधिकृत बांधकाम विभागाचे प्रमुख नरेंद्र संखे, शिवमंदीर परिसरातील बीट मुकादम यांच्या नजरेतून आर्थिक देवाण-घेवाण करून लपविले जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
या संदर्भात अनधिकृत बांधकाम विभागाचे प्रमुख नरेंद्र संखे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
