खामगाव : खामगाव येथे महाविकास आघाडीची सभा संपताच काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व काँग्रेस सेवादलाचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यात धक्काबुक्की झाली. महाविकास आघाडीचे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ काल खामगाव येथील जे.व्ही. मेहता महाविद्यालयाच्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली. यावेळी काही कार्यकर्ते तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या अंगावर धावून गेले. तसेच त्यांच्या गाडीच्या काचा देखील फोडल्या. या घटनेमुळे सभास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण सोडविले.
