पाणपोई सुरू, शीत रूम, औषधे यांची सज्जता

ठाणे : दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार कार्यवाहीस सुरूवात झाली आहे. सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात येत आहेत. तसेच, महापालिकेची सर्व आरोग्य केंद्र, पालिका रुग्णालय यांनी शीत रुम आणि औषधे यांची सज्जता ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

तीव्र उष्णतेमुळे होणाऱ्या आजाराच्या प्रतिबंधासाठी ठाणे महानगरपालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेच्या धोक्याला नियंत्रण करण्यासाठी सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा, महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व काऊन्सील ऑफ ऍनर्जी एनव्हायरोमेंट अॅण्ड वॉटर या संस्थेने एकत्रितपणे तयार केलेला आहे. उष्णतेच्या लाटेच्या सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे.

ठामपा क्षेत्रातील ३३ आरोग्य केंद्रे, ५ प्रसूतीगृहे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उष्माघात, त्याची लक्षणे, घ्यायची काळजी याची माहिती देणारी पत्रके लावण्यात आली आहेत. तसेच, उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी औषधे, शीत रूम तयार ठेवलेली आहे. आरोग्य केंद्रांनी त्यांच्या परिसरातील रहिवासी संकुलामध्ये जनजागृती पत्रके लावली आहेत. त्याचबरोबर, खाजगी रुग्णालयांनाही उष्णतेच्या आजाराला सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. शाळा, महाविद्यालये येथेही जागृती करण्यात येत आहे.

संस्थांची बैठक

या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी काय करावे, काय करू नये, उष्णतेच्या आजाराची लक्षणे कोणती, पाणपोईची व्यवस्था आदींबाबत चर्चा करण्यासाठी शनिवार, सायंकाळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली एका ऑनलाईन बैठक सत्राचेही आयोजन महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केले होते. त्यात, रिक्षा संघटना, टॅक्सी संघटना, कामगार उपआयुक्त यांचे प्रतिनिधी, उपआयुक्त (शिक्षण), एमसीएचआय-क्रेडाई, हॉटेल असोसिएशन, उद्योग संघटना, टीसा, मेट्रो, एमएसआरडीसी, रेल्वे, एसटी महामंडळ, आरटीओ यांचे प्रतिनिधी, सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

तीन ठिकाणी पाणपोई सुरू

आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महापालिका क्षेत्रात निरनिराळ्या ठिकाणी उष्माघात, लक्षणे, घ्यायची काळजी यांची माहिती देणारे फलक, डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत. पोस्टर्सच्या माध्यमातून सर्व गृहसंकुलांपर्यंत ही माहिती पोहोचवली जात आहे. तसेच, ठाणे महापालिकेच्या आवाहनानुसार, सीएसआरच्या माध्यमातून पाणपोई सुविधाही उपलब्ध केली जात आहे. सध्या ठाणे रेल्वे स्टेशन, नौपाडा-आईस फॅक्टरी, तीन हात नाका – सिग्नल शाळेसमोर या तीन ठिकाणी समर्थ भारत व्यासपीठामार्फत पाणपोई सुरू करण्यात आली आहे. त्यात दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संस्था करणार आहे, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *