शुभेच्छा
प्रसाद आठल्ये
पार्ल्यातील हनुमान मार्ग सार्वजनिक गणेशोत्सव लोकसेवा मंडळ या सुपरिचित संस्थेने मिलिंद रघुनाथ पूर्णपात्रे या बॅडमिंगटनपटुना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे त्याबद्दल सर्व प्रथम त्यांचं मनापासून अभिनंदन. त्यांचं म्हणजे मिलिंदचे व लोकसेवा मंडळ या संस्थेचेही कारण जीवन गौरव पुरस्कारासाठी त्यांनी अगदी योग्य व्यक्ती निवडली आहे.
अनेक प्रतिभाशाली कलाकारांची खाण म्हणून प्रसिद्ध असलेलं पारले हे वेगवेगळ्या खेळात पारंगत अशा खेळाडूंचीही मंदियाळी आहे. अजित पै, सुशांत मराठे, अमोल मुझुमदार , प्रकाश पदुकोण, अंजली भागवत, वीणा परब, अंजली पेंढारकर, छाया पवार, शाम रहाटे ही काही उदाहरणे. या सर्व गुणवंतांच्या मेळ्यातीलच एक नाव म्हणजे मिलिंद रघुनाथ पूर्णपात्रे. एखाद्या खेळाला सर्व जीवन समर्पित करणे म्हणजे काय हे मिलिंद कडून शिकावे. खाली दिलेली त्याच्या काही मोजक्या यशस्वी क्षणाची यादी त्याची साक्ष देते. त्याच्या सर्वच पुरस्कारांची व यशोशिखरांची यादी द्यायची झाली असती तर तिने आपल्या वाण सामानाच्या यादीच्या लांबीलाही लाजवलं असतं.
मला सांगा एखादा पारंगत, दिग्गज खेळाडू एखादा खेळ राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय पातळीवर सामान्यतः किती वर्ष खेळू शकतो? तर 20/25 वर्ष म्हणजे अगदी डोक्यावरून पाणी . त्यानंतर मग तो प्रशिक्षक, पंच, बोलायला बरा असेल तर समलोचक, लिहिणं बरं असेल तर क्रिटिक, जनसंपर्क बरा असेल तर निवड समितीचा सदस्य या मार्गानेच जातो व तरच या खेळाशी निगडित राहू शकतो. पण मिलिंद मात्र गेली तब्बल पन्नास वर्ष बॅडमिंगटन कोर्ट वर सक्रिय आहे एक खेळाडू या नात्याने. ही खरंच थक्क करणारी गोष्ट आहे. थोडं थांबून विचार करा 50 वर्षे खेळाडू म्हणून सक्रियता.!!! त्यासाठी लागणारी शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक तयारी कमविण्यासाठी तो या वयातही मेहनत घेतो. आणि या स्फूर्तीचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या खेळावरील त्याचं आत्यंत्यिक प्रेम.
साहजिकच प्रश्न पडतो की हे सगळं आलं कुठून? याची सुरुवात कुठून व कशी झाली? सांगतो. मिलिंदचा जन्म चाळीसगाव येथे एका माध्यमावर्गीय खेळाडू कुटूंबात झाला. कुटुंब खेळाडू अशासाठी की वडील, काका, आजोबा सगळेच कुठल्या ना कुठल्या खेळात पारंगत. विशेष करून मल्लविद्या व कबड्डी. गंमत म्हणजे मिलिंदचा पहिला ध्यास हा कुस्तीपटू होण्याचाच होता. त्यासाठी कमावलेल्या शरीराच्या खुणा त्याच्या व्यक्तिमत्वात आजही दिसून येतात. पण त्याच बरोबर तो क्रिकेट व बॅडमिंटनही खेळे. भानू काका सोनावणे हे त्याचे बॅडमिंटनचे गुरू. त्यांनी किशोर वयातील मिलिंदला सल्ला दिला की,’ तू उत्तम खेळतोस पण कोर्ट वरील चापल्य व पदलालित्य टिकवायचं असेल तर कुस्तीसाठी कमावलेले बोजड शरीर हा एक मोठाच अडथळा ठरेल. 13/14 वर्षाच्या मिलिंदने हा सल्ला मानला, कुस्तीला रामराम ठोकला आणि महाराष्ट्राला एक स्टार बॅडमिंटन खेळाडू लाभला.
पण हा त्याचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. एक तर हा खेळ प्रचंड महागडा. मिलिंदचे वडील सरकारी नोकरीत तर आई साधी गृहिणी. अनेक वर कामे करून ती घर खर्चात हातभार लावत असे तरी परीस्थिती बेताचीच. म्हणून मिलिंदने वेळप्रसंगी उदबत्त्या व कालनिर्णय कॅलेंडर विकून पैश्यांची नड भागवली आहे. दुसरं म्हणजे त्याकाळी हा खेळ फक्त पुण्या मुंबई सारख्या शहरांतच खेळला जाई. चाळीसगावा सारख्या तालुक्याच्या गावी त्याची साधना करणं सोपं नव्हतं. म्हणून त्याचे आजोबा डॉ. कै. वा. ग. पूर्णपात्रे यांनी खास चाळीसगावकरांसाठी बॅडमिंटन कोर्ट तयार करून घेतलं होतं. पण तेव्हा जळगाव, धुळे, नाशिक, पुणे या सर्व तालुका व जिल्ह्याचं मिळून पुणे विद्यापीठाचा संघ बनत असे . त्यामुळं त्या संघात स्थान मिळवीणे हे फार जिकिरीचे काम असे. त्या विभागात पुण्याचा संघ कायम विजेता असल्याने विद्यापीठाच्या संघात बऱ्याचदा सहाच्या सहा खेळाडू हे पुण्याचेच असत. परंतु निव्वळ गुणवत्तेच्या जोरावर मिलिंदने हे चित्र बदलून टाकले. 1977 साली जळगाव व धुळे जिल्हा तून पुणे विद्यापीठा करिता खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला. पुढे 1980 साली तर त्याच्या जिल्ह्याच्या संघाने पुण्याला हरवलं. आता पुणे विद्यापीठाच्या संघात त्याच्या जिल्ह्याचे चार तर पुण्याचे फक्त दोन खेळाडू निवडले गेले. या संघांचे नेतृत्व ही मिलिंदलाच बहाल करण्यात आले. या मॅचमधील मिलिंदच्या खेळाने प्रेक्षक इतके प्रभावित व उत्तेजित झाले होते की त्यांनी नंतर मिलिंदला खांद्यावर घेऊन त्याची स्टेडियम मधे उत्स्फूर्त मिरवणूकच काढली होती.
मिलिंदची खेळातील घोडदौड आता खऱ्या अर्थाने सुरु झाली होती. नोकरी निमित्त तो मुंबईला आला. आयकर खात्याच्या खेळाडूंच्या भरतीच्या निवडी मध्ये केवळ पहिल्या 5 मिनिटात त्याची खेळातील नैपूण्याची प्रमाणपत्रे पाहुन सारेच चाट पडले. त्याच क्षणी लगेच दुसऱ्या दिवशी पासून नोकरीवर रुजू होण्याचं पत्र त्याला देण्यात आलं. 1980 ते 90 च्या दशकात केवळ राहत्या घरासाठी मुंबईत करावी लागणारी दगदग जर त्याच्यात वाट्याला आली नसती तर पी.जे . हिंदू जिमखान्या सारख्या मात्तबर जिमखान्यात त्याचा खेळ बहरला असता व तो आंतर राष्ट्रीय क्षितिजावर लवकर चमकला असता. पण या हालअपेष्टाना तोंड देऊनही त्याने जी मजल मारली आहे आणि आजही त्याचं स्थान टिकवून ठेवलं आहे त्याला खरंच तोड नाही. त्याच्या या प्रवासातील काही ठळक टप्प्याकडे नजर टाकली की हे सहज लक्षात येतं. त्याच्या गेल्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत तो तब्बल 35 च्या आसपास राष्ट्रीय स्पर्धा खेळला आहे.
1.जळगाव, धुळे जिह्यातून पुणे विद्यापीठाला खेळणारा व कर्णधार पद भूषवणारा पाहिला बॅडमिंटन खेळाडू.
2.आयकर खात्याच्या 2 राष्ट्रीय स्पर्धात 30/35 वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी. तो कर्णधार
असताना 2002/03 मधे सुवर्ण पदक तर 2005/06 ला रौप्य पदक.
मिलिंद प्रशिक्षक असताना त्यांच्या महिला संघाने तीन वेळा सुवर्ण पदक मिळवले.
2017 मधे 50 वर्षावरील एकेरीत सुवर्ण पदक.
2011 पासून आज पावेतो ते सातत्याने Master National Badminton स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे 45+, 50+, 55+, 60+ वयोगटात एकेरी व दुहेरीत प्रतिनिधित्व करत आहेत.
तर स्विडन येथे झालेल्या World Master International Badminton स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलं.
त्याला मिळालेल्या पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे.
i. खेळ सेवा अवॉर्ड (2013)
ii. शिवरत्न पुरस्कार ( 2016)
iii. क्रीडा प्राविण्य पुरस्कार ( 2017)
iv. अष्टगंध जीवन गौरव पुरस्कार(2019)
v. दिल्ली सरकार तर्फे Life time achievement appreciation award (2019)
vi. गुण गौरव पुरस्कार ( 2021)
vii. मराठी गौरव पुरस्कार ( 2023).
त्याच्या या वाटचालीच बरंचस श्रेय तो त्याच्या कुटुंबियांना देतो. आई कै. सिंधुताई पूर्ण पात्रे वडील कै.रघुनाथ पूर्णपात्रे आजोबा कै. काकासाहेब पूर्णपात्रे., काका डॉ. कै. सुभाष पूर्णपात्रे, प्रिन्सिपॉल डि. वी. चित्ते सर, मार्गदर्शक कै. भानुकाका सोनावणे, अनिल प्रधान,इंडोनेशिया मधून त्याच्यासाठी दोन खास योनेक्स च्या रॅकेट्स आणणारा लहान भाऊ सुनिल व त्याच्या फिटनेस डोळ्यात तेल घालून सांभाळणारी त्याची पुतणी डॉ. संहिता हे सर्वजण त्याच्या यशाचे शिल्पकार आहेत असं तो मानतो. ऑफिस मधून रोज परस्पर जिमखाना व रात्री 10.30 ला घरी येणे तसंच सतत या ना त्या स्पर्धेसाठी दौऱ्यावर असणं यापायी घरच्या मंडळींच्या वाट्याला तो फार कमी येत असे. पण म्हणून कोणतीही कुरबुर न करता उलट घरची संसाराची बाजू भक्कम पणे सांभाळणाऱ्या त्याच्या सौभाग्यवती सुप्रिया, मुली श्रेया व मधुरा, संजीवनी वहिनी व बहिण सुषमा ताई यांचाही उल्लेख तो आवर्जून करतो.पण हा फक्त त्याच्या खेळाचा भाग झाला जीवन गौरव पुरस्कार म्हटल्यावर त्याच्या जीवनाचा सांगोपांग मागोवा जरुरी आहे. आणि यातही मिलिंद लव्ह गेम मारतो. मुंबई सारख्या शहरात ऐन उमेदीच्या काळात त्याला 10 ठिकाणी पेइन्ग गेस्ट म्हणून वास्तव्य करावं लागलं. त्याच्या गुणवत्तेला या काळात म्हणावी तशी पोच पावती मिळाली नाही तरी त्याने मनात कटुतेला स्थान दिल नाही की कोणत्याही व्यसनाला आजूबाजूला फिरकू दिल नाही. मात्र माणसं जोडण्याचं त्याला कमालीची व्यसन आहे. सर्व स्तरावर, सर्व वयाचे व भारतातच नव्हे तर जगभर सर्वदूर त्याचे मित्र आहेत. नियमित त्याच्या संपर्कात आहेत. याला कारण म्हणजे त्याचा मनमिळाऊ, गोड व अत्यंत परोपकारी स्वभाव. या 50 वर्षांच्या कारकिर्दीत नोकरी आधी मिलिंद घाटे, विवेक जोशी तर नोकरी लागल्यावर 25 वर्षे पार्टनर असलेला बेनहर सोलोमन हे त्याचे सुहृद आजही त्याच्या संपर्कात आहेत.आयकर खात्यातील काही क्षुल्लक कामा वरून आमची बऱ्याच वर्षांपूर्वी जी ओळख झालीये ती आजपर्यंत कायम आहे. केवळ एकच खंत वाटते ती ही की 1980-90 च्या दशकातील मिलिंदचा सर्वोच्च खेळ बघायचं भाग्य माझ्या बशिबी नव्हतं.असो.
मिलिंद तुला तुझ्या पुढील अथक वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा!
राज्यस्तरीय क्रिकेटपटू, नट, लेखक